गुजरात विधानसभेत गृहराज्यमंत्र्यांना असंसदीय शब्द वापरून संबोधणारे काँग्रेसचे आमदार निलंबित !

  • विधानसभेत गावगुंडांप्रमाणे असांस्कृतिक वर्तन करणारे काँग्रेसचे आमदार समाजाला दिशादर्शन काय करणार ? – संपादक
  • अशा आमदारांचे केवळ निलंबन नको, तर त्यांना कठोर शिक्षा सुनावणे आवश्यक ! – संपादक
निलंबित आमदार पुंजाभाई वंश

कर्णावती – गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांना ‘टपोरी’ (टवाळखोर) असा असंसदीय शब्द वापरून संबोधल्यामुळे गुजरात काँग्रेसचे आमदार पुंजाभाई वंश यांना विधानसभेतून ७ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

१. गुजरात विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २ मार्च या दिवशी चालू झाले. अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशी काँग्रेसचे आमदार नौशाद सोलंकी यांनी एक प्रश्‍न विचारला. त्याला सरकारकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे सांगत ते त्यांची आसंदी सोडून विधानसभेच्या पटलावर जाऊन बसले. (अशा बेशिस्त आमदारांचा भरणा असलेली काँग्रेस राज्य करण्याच्या पात्रतेची आहे का ? – संपादक)

२. नौशाद सोलंकी यांच्या या वागणुकीवर गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी आक्षेप घेत, ‘असा उद्दामपणा खपवून घेतला जाणार नाही’, असे सांगितले. त्यानंतर काँग्रेस आमदारांनी विधानसभेत गदारोळ घातला.

३. त्यानंतर काँग्रेसचे आमदार पुंजाभाई वंश यांनी गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांचा ‘टपोरी’ असा उल्लेख केला. ते ऐकून महसूलमंत्री राजेंद्र त्रिवेदी यांनी हस्तक्षेप करत पुंजाभाई वंश यांना त्यांचे शब्द मागे घेण्यास सांगितले.

४. पुंजाभाई वंश यांनी हा शब्द मागे घेतल्याचे सांगितले; मात्र विधानसभेतील भाजपचे नेते पंकज देसाई यांनी त्यांना ७ दिवसांसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव बहुमताने मान्य झाल्यामुळे पुंजाभाई वंश यांना विधानसभेतून बाहेर पडावे लागले.