पुतिन यांना दिली होती मॉस्कोवर आक्रमण करण्याची धमकी !
वॉशिंग्टन (रशिया) – माझ्या राजवटीतही पुतिन युक्रेनवर आक्रमण करण्याची सिद्धता करत होते; मात्र मी त्यांना रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये बाँबस्फोट करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पुतिन गप्प बसले, असा दावा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांनी त्यांचे मित्र जॉन डेली यांच्याशी दूरभाषवर बोलतांना हा दावा केला आहे. या संवादाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
(सौजन्य : RJTV 24)
१. ट्रम्प पुढे म्हणाले की, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या सरकारच्या काळात रशियाने क्रिमियाला नियंत्रणात घेतले होते आणि आता बायडेन यांच्या राजवटीत युक्रेनवर आक्रमण झाले. माझ्या राजवटीत अमेरिकेवर डोळे वटारण्याचे कुणाचेही धाडस नव्हते.
२. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविषयी ते म्हणाले की, मी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना म्हटले होते की, तुम्ही अधिक उड्या मारू नका, अन्यथा तैवान लवकरच नवीन देश बनेल. यानंतर जिनपिंग शांत झाले.
३. ट्रम्प पुढे म्हणाले की, आमचे सैन्य अफगाणिस्तानातून परतल्यानंतर रशिया आणि चीन यांना प्रोत्साहन मिळाले आहे. दोन्ही देशांना समजले आहे की, अमेरिका आता कमकुवत झाली असून कोणताही मोठा निर्णय ती घेऊ शकत नाही. रशिया-युक्रेन युद्धानंतर चीन तैवानवरही आक्रमण करू शकतो.