युक्रेनहून आतापर्यंत ११ सहस्र भारतीय परतले

नवी देहली – भारताने ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत आतापर्यंत ११ सहस्र भारतियांना युक्रेनमधून सुरक्षित परत आणले आहे, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन् यांनी दिली. आतापर्यंत ४८ विमाने भारतात पोचली असून त्यांपैकी १८ विमाने ही गेल्या २४ घंट्यांत पोचली आहेत. या १८ विमानांतून परतलेल्या भारतियांची संख्या अनुमाने ४ सहस्र आहे. भारत युक्रेनच्या शेजारी असलेल्या रोमानिया, हंगेरी, स्लोव्हाकिया आणि पोलंड या देशांमधून नागरिकांना विशेष विमानांद्वारे भारतात परत आणत आहे.

घायाळ हरजोत याचा वैद्यकीय खर्च भारत सरकार करणार

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, कीवमध्ये गोळीबारात घायाळ झालेल्या हरजोत सिंह या भारतीय विद्यार्थ्याचा वैद्यकीय खर्च भारत सरकार उचलणार आहे. हरजोतवर कीव येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. हरजोत याला ४ गोळ्या लागल्या होत्या, त्यात एक गोळी छातीला लागली होती. तो देहलीचा रहिवासी आहे.