राहु राशीचा मेष राशीतील प्रवेशामुळे जगभरात निर्माण होणार प्रतिकूल स्थिती !
नवी देहली – राहु ग्रह १७ मार्च २०२२ या दिवशी मेष राशीत प्रवेश करणार आहे. राहू राशीचा हा पलट १८ मासांनंतर होत असून त्यामुळे जगात मोठे पालट घडून येतील, असा अंदाज भविष्यकारांनी वर्तवला आहे. या पालटाचे परिणाम भारतातही दिसून येणार आहेत. मार्च २०२२ मध्ये होणार्या या राहू संक्रमणाचा देशाचे राजकारण, अर्थव्यवस्था आणि सामान्य जीवन यांवर परिणाम होणार आहे.
१. ज्योतिषशास्त्रानुसार राहु आणि केतु हे ग्रह नेहमी विरुद्ध दिशेने फिरतात. ते १८ मासांनी राशी पालटतात. १७ मार्चला राहु वृषभ राशीतून मेष राशीत प्रवेश करील. या राशीत तो पुढील दीड वर्ष राहील. राहूच्या मेष राशीत प्रवेशाच्या वेळी जन्मकुंडलीचे विश्लेषण केले, तर शनि, मंगळ आणि शुक्र या ३ ग्रहांची युती होत आहे. या ग्रहमानामुळे संपूर्ण जगात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्याचा परिणाम भारतावरही होईल.
२. ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रहमानामुळे खाण्या-पिण्याचे संकट निर्माण होईल. पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात वाढ झाल्याने दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढतील. या परिस्थितीमुळे धान्याच्या किमतीही वाढतील.
३. या कालावधीत भारतात अवकाळी पाऊस पडेल, ज्यामुळे शेतातील उभ्या पिकांची मोठी हानी होऊ शकते.
४. राहूचे संक्रमण भारताच्या राजकारणातही गोंधळ निर्माण करू शकते. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते. मोठे नेते आणि अधिकारी यांच्याशी संबंधित अप्रिय घटना घडू शकतात. यासह पूर आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याचीही शक्यता आहे.