पालकांनी पाल्यांसाठी सर्वांगांनी सक्षम व्हावे !

नोंद 

 

कोरोनामुळे बालवाडी शाळा बंद असल्याने पालकांना स्वतःच्या मुलांना आता थेट प्राथमिक शाळांमध्ये पाठवावे लागत आहे. त्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. बालवाडीपासूनच मुलांची शाळेमध्ये जाण्याची आणि तेथूनच समाज जीवनात वावरण्याची प्राथमिक पायरी चालू होत असते; पण कोरोनामुळे गेली २ वर्षे शाळा बंद असल्याने लहान मुलांवर ही वेळ आली आणि याचा त्यांच्या मनावर परिणाम होत आहे. पालकांनी कोरोना संसर्गाच्या काळात विद्यार्थ्यांना घरी शिकवण्याचा प्रयत्न केला; पण मुलांनी पालकांचे न ऐकणे, शाळेतल्या शिक्षकांप्रमाणे पालकांना गांभीर्याने न घेणे, मुलांच्या अभ्यासाच्या वेळेचे नियोजन बनवता न येणे, अशा अनेक समस्यांना पालकांना तोंड द्यावे लागले आणि त्यातून त्यांनाही नैराश्य आले अन् घरातील वातावरण चिंताग्रस्त झाले.

मुलांची २ वर्षे शैक्षणिक, मानसिक विकासाची झालेली हानी कशी भरून काढायची ? हे पालकांपुढे एक मोठे आव्हान आहे. ही सर्व परिस्थिती पालकांना आत्मचिंतन करायला भाग पाडते. कोरोनामधून आता आपण थोडे सावरत आहोत आणि परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे. शाळा, महाविद्यालये पुन्हा चालू झाली; पण येणार्‍या भावी आपत्काळात पुन्हा असेच संकट आले, तर त्याला तोंड कसे द्यायचे ? किंवा याहून भयंकर संकटाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते, याचे चिंतन व्हायला हवे. पालकांनी मुलांसाठी त्यांच्या स्थितीनुसार शिक्षक बनायला हवे. त्यासाठी पालकांनी सर्वांगांनी सक्षम होणे आवश्यक आहे. लहान मुले, पौगंडावस्थेतील आणि प्रौढ मुले सर्वांचेच मानसशास्त्र वेगवेगळे असते. त्यांच्या स्तरावर जाऊन त्याचा अभ्यास करून मुलांवर घरातूनच प्रत्येक पालकाने संस्कार करायला हवेत. हे दायित्व सक्षमपणे पार पाडण्यासाठी पालकांनी त्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

मुलांना शैक्षणिकदृष्ट्या, तसेच मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पालकांनी आधी स्वत: सक्षम होणे आवश्यक आहे. पालकांनाच आता मुलांसाठी शिक्षक बनावे लागेल. पालकांनी स्वतःतील दोष आणि अहं यांवर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यास कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाणे सहज शक्य आहे. हाच भाग लहानपणापासून मुलांकडून करून घेतला, तर त्यांनाही भावी जीवनामध्ये येणार्‍या संकटांना सामोरे जाणे सोपे जाणार आहे. त्यामुळे आपणच आपल्या पाल्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम बनवूया.

– श्री. जयेश बोरसे, पुणे