२६ जानेवारीनिमित्त शाळांची सुुट्टी रहित !

महाराष्‍ट्र शासनाचा निर्णय !

देशभक्‍तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्‍याचे निर्देश

मुंबई – प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारीला राज्‍यातील शाळांना देण्‍यात येणारी सुुटी रहित करण्‍याचा निर्णय महाराष्‍ट्र शासनाने घेतला आहे. विद्यार्थ्‍यांना सुटी देण्‍याऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्‍तीपर कार्यक्रमांचे आयोजन करावे आणि विद्यार्थ्‍यांमध्‍ये राष्‍ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. यासंदर्भात सरकारने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

२६ जानेवारी या दिवशी शाळांमध्‍ये ध्‍वजारोहणानंतर नृत्‍य, चित्रकला, निबंध, प्रभातफेरी, वक्‍तृत्‍व स्‍पर्धा, कविता स्‍पर्धा आणि क्रीडा स्‍पर्धा अन् प्रदर्शन यांचा समावेश करण्‍यात आला आहे. हे सगळे कार्यक्रम देशभक्‍तीपर संकल्‍पनेवर आधारितच असावेत, असे पत्रकात म्‍हटले आहे. जिल्‍हा शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांना निर्देशाची कार्यवाही करावी लागणार आहे.