रशिया-युक्रेन युद्धामध्ये युक्रेन गनिमी कावा पद्धतीने युद्ध करत आहे. रशिया अधिकाधिक धोकादायक शस्त्रांचा वापर करण्याची धमकी देत आहे. या पार्श्वभूमीवर हे युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. या निमित्ताने अणूयुद्धाचा भडका उडेल का ? अशी भीती व्यक्त होत आहे. या संदर्भात ‘लोकमत यू ट्यूब’ वाहिनीवर (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी रशिया-युक्रेन युद्धाचे केलेले विश्लेषण येथे देत आहोत.
१. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनने गनिमी कावा पद्धतीने लढाई करणे
‘रशिया-युक्रेन युद्धाला ७ दिवस उलटून गेले आहेत. रशियाने चारही दिशांनी पारंपरिक युद्ध पुकारले. रशियाने रणगाडे, तोफखाने आदी पाठवण्यापूर्वी ‘शॉर्ट रेंज बॅलेस्टिक’ (छोट्या पल्ल्याची क्षेपणास्त्रे) क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून युक्रेनच्या ‘पिन पाँईट टार्गेट’वर (अचूक स्थानांवर) आक्रमण केले. त्यांना वाटले, ‘युक्रेनचे १०-१५ वायू तळ आणि ५०-६० सैनिकी तळ आहेत.’ त्यांनी या क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने त्या इमारती नष्ट केल्या; परंतु त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसले नाही. रशियाने त्यांचे सैनिक आणि रणगाडे वगैरे युक्रेनच्या आत पाठवले. त्यांना वाटले, ‘आपण गेली ८ वर्षे ‘हायब्रिड वॉर’ (एकही गोळी न चालवता युद्ध पुकारणे) लढत आहोत. त्यामुळे युक्रेन घाबरलेले आहे. जसे आमचे रणगाडे आग ओकत पुढे येतील, तसे ते पळून जातील’, पण तसे झालेले नाही. युक्रेनने त्यांना आत येऊ दिले आणि गनिमी कावा युद्धाच्या काही चांगल्या युक्त्या वापरल्या. या सैन्याच्या मागाहून अन्न-पाण्याची रसद (पुरवठा) घेऊन येणार्या सैन्यावर त्यांनी आक्रमण केले. त्यामुळे रशियाची अडचण झाली.
२. युक्रेन सैन्याकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा चांगला वापर केला जाणे
या वेळी माहिती युद्धही चालू आहे. एक माहिती रशियाकडून येते, तर दुसरी युक्रेनकडून मिळते. युक्रेनकडून आलेल्या माहितीप्रमाणे ‘रशियाचे अनुमाने ३ सहस्र ५०० सैनिक मारले गेले आहेत. त्यांच्या अनेक तोफा नष्ट झाल्या आहेत. रशियाला मोठी हानी पोचवण्यात आली’, असे सांगितले. त्या वेळी ही माहिती खरी वाटली नव्हती; परंतु ज्या प्रकारे युद्ध चालू आहे आणि रशियाला युक्रेनचे कुठलेही शहर कह्यात घेता आले नाही, ते पहाता युक्रेनचे लोक दाखवत असलेल्या लढाऊ वृत्तीची प्रशंसा केली पाहिजे. युक्रेनकडे शस्त्रास्त्रांसह लढण्याची मानसिकताही आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांचे राष्ट्राध्यक्षही ते सैन्यासमवेत असल्याचे दाखवून देत आहेत. याखेरीज युक्रेनकडे ड्रोनची संख्या बर्यापैकी असून तेही या युद्धात उडतांना दिसत आहेत. युक्रेन सैन्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा चांगला वापर केलेला दिसत आहे. त्यामुळे रशियाला वाटले त्याप्रमाणे हे युद्ध संपण्याचे नाव काही घेत नाही.
३. युक्रेनच्या नागरिकांनी युद्धात सहभागी होणे, हे रशियासाठी चिंताजनक असणे !
रशियाने ‘पाईंट टार्गेट’ (ठिकाणांना लक्ष्य करणे) नष्ट करणार्या ‘प्रेसिजन गायडेड मिसाईल’चा (मार्गदर्शित क्षेपणास्त्रांचा) वापर केला होता. जेव्हा शहरांसाठी लढाई होईल, तेव्हा रशियाच्या सैनिकांना लढणे कठीण होणार आहे; कारण तेथील प्रत्येक इमारतीमध्ये युक्रेनचे सैनिक तैनात असतील. कुणाकडे बंदूक, कुणाकडे रॉकेट लाँचर असेल. या युद्धात युक्रेनच्या नागरिकांचाही सहभाग असेल आणि ते गनिमी कावा पद्धतीने लढतील. त्यामुळे रशियाच्या सैन्याला शहराच्या मध्यभागी जाणे सोपे रहाणार नाही.
(सौजन्य : Brig Hemant Mahajan,YSM)
४. रशियाच्या सैनिकांनी रणगाडे सोडून पळून जाणे, हे युक्रेनचे सैन्य चांगला लढा देत असल्याचे निदर्शक !
ज्या प्रकारे युक्रेनचे नेतृत्व, सैनिक आणि त्यांचे नागरिक लढत आहेत, त्या तुलनेत रशियाचे सैन्य लढतांना दिसत नाही. रशियात सैनिक २-३ वर्षांसाठी सैन्यात भरती होतात. त्यात एक वर्षांचे प्रशिक्षण आणि २ वर्षे काम यांचा समावेश असतो. त्यामुळे त्यांचे लक्ष सैन्यातून बाहेर पडल्यानंतर अन्न, वस्त्र आणि निवारा यांची लढाई कशी जिंकायची ? याकडे असते. त्यामुळे त्यांच्यामध्ये विजिगीषु वृत्ती अल्प असते. असे समजते की, रशियाचे सैनिक रणगाडे सोडून पळून गेले आहेत. ही बातमी युक्रेनकडून आलेली असल्याने त्यात किती सत्यता आहे, हे सांगता येणार नाही; पण युक्रेनचे सैन्य चांगला लढा देत आहेत, एवढे निश्चित !’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.