गोव्याची ‘वेश्याव्यवसायाचे एक प्रमुख केंद्र’, ही ओळख पुसली पाहिजे ! – ‘अन्याय रहित जिंदगी’ महिला संघटना

असे आवाहन करण्याची वेळ येऊ देणे, हीच शोकांतिका आहे ! पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली ज्यांनी गोव्याची अशी अपकीर्ती केली, त्यांना खडसावले पाहिजे !

पणजी, ३ मार्च (वार्ता.) – गोव्याची ‘वेश्याव्यवसायाचे एक प्रमुख केंद्र’, अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. गोव्यात वेश्या सहजतेने उपलब्ध असतात, असे चित्र निर्माण केले गेले आहे. गोव्यात वेश्याव्यवसायातून बाहेर पडलेल्या युवती आणि महिला यांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या ‘अन्याय रहित जिंदगी’ या संघटनेने मागील ५ वर्षांत गोव्यात वेश्याव्यवसायात अडकलेल्या देशातील २४ राज्यांमधील महिलांचे पुनर्वसन केले आहे. यावरून या राज्यांचे वेश्याव्यवसायाला अनुसरून गोव्यात जाळे असल्याचे स्पष्ट होते. वर्ष २०१४ ते वर्ष २०१९ या ६ वर्षांच्या कालावधीत १८ ते ४२ वर्षे वयोगटातील ४ सहस्र ५०० गोमंतकीय महिलांचे पुनर्वसन संघटनेने केले आहे. वेश्याव्यवसायात गोमंतकातील ७ टक्के महिला सहभागी आहेत आणि हीसुद्धा एक गंभीर गोष्ट आहे, अशी माहिती ‘अन्याय रहित जिंदगी’ या संघटनेचे संस्थापक अरुण पांडे यांनी दिली. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ‘गोव्यातील वेश्याव्यवसाय : सद्यःस्थिती, आव्हान आणि उपाययोजना’ या विषयावर अरुण पांडे बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘गोवा वेश्याव्यवसायाचे एक प्रमुख ठिकाण आहे, अशी गोव्याची प्रतिमा नष्ट करण्यासाठी महिला आयोगाने एखादे धोरण राबवले पाहिजे. महिला आयोगाने महिला वेश्याव्यवसाय का अवलंबत आहेत ? त्यांची पार्श्‍वभूमी कोणती आहे ? याविषयी एखादे सर्वेक्षण केले पाहिजे. गोमंतकातील सर्वसामान्य नागरिकांनाही नियोजनबद्ध चाललेल्या आणि महिलांना यामध्ये आकर्षित केले जाणार्‍या वेश्याव्यवसायाविषयी माहिती दिली गेली पाहिजे. सद्यःस्थितीत वेश्याव्यवसायातील दलाल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांना या व्यवसायात ओढत आहेत. वेश्याव्यवसायातील ग्राहक, दलाल, हॉटेल आणि मसाज पार्लर यांचे जाळे नष्ट केले पाहिजे. पूर्वी केवळ समुद्रकिनारपट्टीवर चालत असलेला वेश्याव्यवसाय आता शहरातील निवासी प्रकल्पामध्ये चालू आहे आणि ही एक गंभीर गोष्ट आहे. सदनिका भाड्याला देतांना संबंधित मालकाने सतर्क राहिले पाहिजे.’’