प.पू. दास महाराज यांनी ‘विदेही स्थिती’विषयी केलेले विवेचन

प.पू. दास महाराज

१. प.पू. दास महाराज यांचे वडील प.पू. भगवानदास महाराज यांनी वाईट शक्तींचा त्रास असलेल्या व्यक्तींवर नामजपादी उपाय करणे आणि त्या वेळी एक वाईट शक्ती वडिलांना त्रास देत असल्याचे पाहून ते सहन न झाल्याने प.पू. दास महाराजांनी गुरुपौर्णिमेनंतर कुणालाही न सांगता ऋषिकेश येथे जाणे

‘वर्ष १९६२ मध्ये माझे वडील प.पू. भगवानदास महाराज हे बांद्यामध्ये वाईट शक्तींचा त्रास असलेल्या व्यक्तींवर नामजपादी उपाय करायचे आणि ते मी पहायचो. तेव्हा प.पू. भगवानदास महाराज (प.पू. बाबा) ध्यानस्थ बसायचे. तेथे अनेक वाईट शक्ती (अनेक अतृप्त आत्मे) असायच्या. त्यांचा एक अधिपती होता. त्याचे शरीर अक्राळविक्राळ होते. काही वेळाने त्याचे रूप राक्षसाप्रमाणे व्हायचे. तो गिधाडाप्रमाणे मान लांब करून माझ्या वडिलांच्या ताेंडाला तोंड लावून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असे. ते मला सहन झाले नाही. त्या वेळी मी गुरुपौर्णिमेनंतर कुणालाही न सांगता आश्रम सोडून सकाळी ५.३० ते ६ वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडलो. मी हरिद्वारला जाऊन गंगेत अंघोळ केली आणि ऋषिकेशला गेलो.

२. शिवानंद स्वामी यांच्या मठात स्वामी चिन्मयानंद यांची भेट होणे आणि त्यांनी प्राणायाम शिकवणे

२ अ. शिवानंद स्वामी यांच्या मठात ४ दिवस रहाणे आणि तेथे स्वामी चिन्मयानंद यांच्या प्रवचनात ‘ध्यानयोग कसा करायचा ?’ हा विषय ऐकून त्यांना भेटायला जाणे : ऋषिकेशला अनेक स्वामींचे मोठमोठे आखाडे आहेत. तेथील शिवानंद स्वामींना मी बद्रीनाथला जाण्याचा मार्ग विचारला. त्यांनी सांगितले, ‘‘जोशीमठापर्यंत गाड्या जातात. तेथून पुढे चालत जावे लागते.’’ मी शिवानंद स्वामींच्या मठात ४ दिवस राहिलो. तेथे स्वामी चिन्मयानंद यांचे प्रवचन ऐकले. त्या प्रवचनामध्ये ‘ध्यानयोग कसा करायचा ? ध्यान कसे लावायचे ?’ हा विषय चालू होता. त्यांचे प्रवचन झाल्यावर मी त्यांना भेटायला गेलो. मी त्यांना माझा परिचय करून दिला. तेव्हा आमच्यात पुढील संभाषण झाले.

२ आ. स्वामी चिन्मयानंद यांना ध्यानयोग शिकवण्याविषयी विचारणे

मी : माझे गुरु भगवान श्रीधरस्वामी आहेत.

स्वामी चिन्मयानंद : मी भगवान श्रीधरस्वामींना चांगले ओळखतो. माझी त्यांच्याशी भेट झाली होती. तुमचा बद्रीनाथला जाण्याचा उद्देश काय ?

मी : ‘तिकडे स्वामींचा मठ आहे. चातुर्मासही आहे आणि तिकडच्या भागातील देवदर्शनही होईल’, या उद्देशाने जायचे ठरवले आहे. (मी त्यांना ‘मी घरी न सांगता आलो आहे’, असे सांगितले नाही.)

स्वामी चिन्मयानंद : जोशीमठापासून पुष्कळ अंतर चालत जावे लागते.

मी : स्वामींचा आशीर्वाद आहे. मी जाईन. मला ध्यानयोग शिकायचा आहे. तुम्ही शिकवाल का ?

२ इ. स्वामी चिन्मयानंद यांनी प्राणायाम करण्याची पद्धत समजावून सांगणे : तेव्हा स्वामी म्हणाले, ‘‘उद्या सकाळपासून आपण प्रयोग घेऊ. शंखनाद होत असलेल्या वर्गात तुम्ही बसा. प्रथम शंखनाद करा. आज एकदा, उद्या दोनदा, परवा तीनदा, असे वाढवत जा. असे आठ दिवस करा. आठ दिवस झाल्यावर दुप्पट होईल, असे एकेक करून वाढवत जायचे. असे आठ दिवस करत चला. त्या वेळी ‘ॐ’कार नाद किती वेळ रहातो ?’, ते पहायचे. श्वास जितका कोंडायला मिळतो, तितका कोंडायचा. नंतर परत उतरवतांना ओठांनी उतरवत कमी कमी करत परत एकावर यायचे.’’ मी तसे केले. त्यांनी माझा तसा सराव घेतला. नंतर ते म्हणाले, ‘‘हे झाल्यावर आता शंखनाद करायचा नाही. आता ‘श्वास किती मिनिटे कोंडतो ?’, हे पहायचे.’’ तसे केल्यावर माझा १० मिनिटांपर्यंत श्वास कोंडायचा.

मग स्वामी म्हणाले, ‘‘आता ‘ॐ’कार नाद चालू करा. आधी ‘ॐ’कार नाद मूलाधारचक्रापासून, म्हणजे नाभीचक्रापासूनच चालू होतो. आज पाच वेळा ‘ॐ’ म्हणायचा आणि नाभीचक्रापासून वराच्या चक्रांकडे यायचे, म्हणजे मणिपूरचक्र, नंतर अनाहतचक्र, असे ५ – ५ ने वाढवत जायचे. मूलाधारचक्रापासून मूळ ध्यानाला आरंभ करायचा. नाभीकमळ हे विष्णुतत्त्व आहे आणि आदिशक्ती कमळातूनच निर्माण झाली आहे. विष्णूच्या नाभीतूनच कमळ वर येते; म्हणून कमळातून ‘ॐ’कार करायचा असतो. तिथून विष्णूची शक्ती मिळते आणि मग नाभीकमळापासून वरच्या चक्रांकडे यायचे.’’ असे वाढवत वाढवत माझा एक सहस्र वेळा ‘ॐ’कार होऊ लागला. त्याला एक मास लागला.

स्वामी म्हणाले, ‘‘असे एक सहस्र वेळा ‘ॐ’कार केल्यावर ते सहस्रारापर्यंत गेले की, ‘शरीर नाहीच’, असे आपल्याला वाटू लागते. त्या वेळी आपले लघवी करणे इत्यादी विधी बंदच होतात. ‘ॐ’कार सहस्रारापर्यंत गेले की, प्रकाश दिसतो. पिवळा, आकाशी, गुलाबी, असे रंग दिसू लागतात आणि मग त्यामध्ये सावली निर्माण होऊ लागते. मग त्यातून शंख, चक्र, गदा, पद्म या आकृत्या उमटू लागतात. त्या अवस्थेत तो आनंद असतो. भावावस्था अनुभवायला येते. डोळ्यांतून भावाश्रू आल्यावर विष्णूचे रूप दिसू लागते. विष्णूचे रूप पाहिल्यावर त्यात ध्यान लागायला लागते. ते ध्यान लागले की, स्वतःचा विसर पडतो, विदेही स्थिती येते. आपण त्याच्याशी एकरूप होऊ लागतो. ‘एक सहस्र वेळा ‘ॐ’कार केल्यावर तो सहस्रारापर्यंत जातो. तेथे तो स्थिर करायचा आणि उतरवतांना जितक्या संख्येने ‘ॐ’कार वाढवले, त्याच्या अर्धभागाने न्यून करत सावकाश खालच्या खालच्या चक्रापर्यंत यायचे. जर का जोरात खाली आलो, तर आपल्या आतल्या सूक्ष्म छोट्या मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे सावकाश यायचे.’’

(क्रमशः)

– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.७.२०२०)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.