मुंबई – अल्पसंख्याकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा मुलगा फराझ यालाही समन्स बजावण्यात आले आहे. दाऊद इब्राहीम टोळी, क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने त्यांच्या विरोधात समन्स बजावले आहेत. मलिक यांच्या नातेवाइकांवरही या संदर्भातील आरोप करण्यात आले आहेत.
मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी दिली आहे. ‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला कह्यात घेऊन केलेल्या चौकशीत दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणार्या आस्थापनाशी मलिक यांचा संबंध असल्याचे ‘ईडी’ला अन्वेषणात आढळले आहे.