रशियाने अत्याधुनिक शस्त्रास्त्रे वापरली, तर युद्ध लवकर संपेल ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

 (सौजन्य : Brig Hemant Mahajan,YSM)

‘रशिया किती दिवसांत युक्रेनवर ताबा मिळवेल ?’ याचे उत्तर देणे सोपे नाही; कारण युक्रेनच्या सैन्याची संख्या अनुमाने ३ ते साडे तीन लाख आहे. त्याच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे आहेत. म्हणजे युक्रेनच्या सैन्याची लढण्याची जी क्षमता आहे, ती प्रचंड आहे. आधी ‘रशियाच्या आक्रमणाने युक्रेन एकदम घाबरून जाईल’, असे वाटले होते; मात्र तसे झाले नाही.

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की स्वत: सैनिकी पोषाखामध्ये सैन्याच्या समवेत आहेत. युक्रेनचे सैन्य लढत आहे आणि त्याचे नेतृत्वही लढण्यासाठी सिद्ध आहे. यामुळे रशियाला युक्रेनला पूर्ण कह्यात घ्यायचे असेल, तर त्याला वेळ लागू शकतो. रशियाचे असे डावपेच असतील की, युक्रेनच्या नेतृत्वाला, जनतेला घाबरवायचे आणि विशेष सैन्य दल पाठवून त्याच्या वरिष्ठ नेत्यांना मारण्याचा प्रयत्न करायचा अन् तेथे त्याला हवी ती राजवट अस्तित्वात आणायची. पारंपरिक लढाई झाली, तर युक्रेनचे सैन्य पुष्कळ वेळ लढू शकते. दुसरीकडे रशियाने अत्याधुनिक शस्त्रास्त्रे वापरली, तर हे युद्ध लवकर संपुष्टात येऊ शकते.

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.