मुंबई, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – मोकाट गुरांच्या संगोपनासाठी आसूडगाव येथे सिडकोकडून स्वतःच्या मालकीची जागा काही वर्षांपूर्वी ‘गोवंश रक्षक संवर्धन संस्थे’ला गोसंगोपनासाठी देण्यात आली होती. ही जागा खाली करण्यासाठी सिडकोकडून २४ जानेवारी या दिवशी संस्थेला नोटीस पाठवून जागा खाली करण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर १७ फेब्रुवारी या दिवशी सिडकोने दुसरी नोटीस पाठवली आहे. दुसर्या नोटिसीमध्ये ‘गोशाळेच्या जागेत ‘श्वास नियंत्रण केंद्र’ कार्यान्वित करायचे आहे’, असे सिडकोने नमूद केले आहे. त्यामुळे या जागेतील गायी, वासरे, बैल आदी २६० गोवंशियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
एक वर्षाच्या मुदतीसाठी देण्यात आलेल्या या जागेला दर वर्षी एका वर्षाची मुदतवाढ सिडकोकडून देण्यात येत होती. मागील काही वर्षांपासून सिडकोने मुदतवाढही दिलेली नाही आणि जागाही कह्यात घेतलेली नाही, तसेच गोशाळेकडूनही मुदतवाढीसाठी पाठपुरावा करण्यात आलेला नाही.
या प्रकरणी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने सिडकोच्या जनसंपर्क अधिकार्यांना दूरभाषवर संपर्क केला. त्या वेळी त्यांनी ‘मी याविषयी माहिती घेतो’, असे उत्तर दिले.
गोवंशीय कसायांकडे जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी !सिडकोकडून गोशाळेसाठी अतिशय दुर्गम आणि लोकवस्ती न्यून असलेल्या भागात पर्यायी जागा देण्यात येत होती; मात्र कसायांच्या भीतीमुळे तेथे गायी नेण्यास गोशाळेने नकार दिल्याचे स्थानिक गोप्रेमीने सांगितले. याविषयी गोशाळा आणि सिडको यांच्याकडून अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. हे गोवंशीय कसायांकडे जाऊ नयेत, यासाठी गोशाळा आणि सिडको यांनी समन्वयाने गोवंशियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे, असे गोप्रेमींना वाटते. |
गोशाळेच्या कार्याचा पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून गौरव !
‘अनेक वर्षांपासून नवी मुंबई, पनवेल या भागांतील मोकाट गायी आणि गोवंश यांचे पालनपोषण करणे, संवर्धन करणे, गायींची प्रसुती करणे, दुखापत झालेल्या प्राण्यांवर औषधोपचार करणे, अंत्यविधी करणे, मानवी वस्तीमध्ये आलेल्या वन्यजिवांना वनात सोडणे, असे कार्य या गोशाळेद्वारे चालू आहे. काही सामाजिक, तसेच शासकीय यंत्रणा, पोलीस यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला आहे. समाजातील गोप्रेमी आणि हितचिंतक यांच्याकडून मिळणार्या अर्थसाहाय्यामुळे हे कार्य चालू आहे’, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष श्री.अरुण गोरे यांनी दिली.