हर्सूल (संभाजीनगर) येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांसाठी पहिले रेडिओ केंद्र चालू होणार !

रेडिओवरील कार्यक्रमांसमवेत बंदीवानांना योग आणि धर्मशिक्षण देणेही आवश्यक आहे. धर्मशिक्षणामुळे त्याप्रमाणे आचरण करून स्वतःमध्ये ते पालट करू शकतील. – संपादक 

संभाजीनगर – येथील हर्सूलमधील मध्यवर्ती कारागृहात नव्याने मराठवाड्यातील पहिले रेडिओ केंद्र चालू करण्यात येणार आहे. चाचण्या पूर्ण झाल्या असून १ सहस्र २०० बंदीवान असणार्‍या कारागृहातील चांगली वर्तणूक असणार्‍या कलाकार बंदीवानांच्या वतीने रेडिओचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ३ विभागांतील ४८ बराकींमध्ये आता ध्वनीसंर्वधक बसवण्यात आले असून आता बंदीवानांना रेडिओवरील कार्यक्रम ऐकता येतील. यातील कोणत्या कार्यक्रमाचे प्रसारण करायचे आणि कोणत्या नाही, हे वरिष्ठ अधिकारी पडताळतील.

हर्सूल येथे कारागृहात बंदीवानांची संख्या नेहमीच अधिक असते. त्यात गुन्हा केल्यानंतरही चांगली वर्तणूक असणारे अनेक बंदीवान आहेत. त्यांना योग्य वातावरण मिळावे; म्हणून गाण्यांसह प्रबोधनाचे कार्यक्रमही रेडिओवरून प्रसारित केले जाणार आहेत. प्रारंभी काही दिवसांत हा कालावधी १ घंटा असावा, असे प्रयत्न आहेत. दर्जा चांगला राहिला, तर आणखी एखाद्या घंट्यांची त्यात भर टाकली जाईल. बंदीवानांमध्ये असणार्‍या कलागुणांना या उपक्रमातून वाव मिळेल. कारागृहात दुपारी १२ वाजता कार्यक्रम प्रसाराची वेळ ठरवण्यात आली आहे. कारागृहाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची या उपक्रमास अनुमती घेण्यात आली आहे, असे कारागृहाचे अधीक्षक अरुणा मुकुटराव यांनी सांगितले.