अपयशाने खचून न जाता अधिक जोमाने प्रयत्न करणे, हेच प्रज्ञानंद याच्या विजयाचे गमक !
‘प्रगल्भता केवळ अमूक वयानंतर येते’, हा सिद्धांत भारताचा बुद्धीबळातील युवा ‘ग्रँडमास्टर’ रमेशबाबू प्रज्ञानंद अर्थात् आर्. प्रज्ञानंद याने खोटा ठरवला आहे. अवघे १६ वर्षे वय असलेला प्रज्ञानंद याने सध्या चालू असलेल्या ‘एअरथिंग्स मास्टर्स ऑनलाईन जलद बुद्धीबळ स्पर्धे’त जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसन यांचा पराभव केला. त्याने कार्लसन यांच्या विजयाचा वारू रोखण्याची किमया केली. १२ व्या वर्षी ‘युवा ग्रँडमास्टर’ बनलेला प्रज्ञानंद खर्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आला तो कार्लसन यांच्यावरील विजयामुळे ! त्याच्या या गौरवशाली कामगिरीसाठी त्याच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ‘अपयश ही यशाची पहिली पायरी असते’, असे म्हटले जाते. प्रज्ञानंदही त्यास अपवाद नाही. त्याला या स्पर्धेतील पहिल्या ७ फेर्यांपैकी ४ फेर्यांत पराभवांचा सामना करावा लागला आहे. त्याने लेव्हॉन ऍरोनियन याच्याविरुद्ध एकमेव विजय संपादन केला आहे, तर २ सामने बरोबरीत सोडवले आहेत. अशी त्याची या स्पर्धेतील संमिश्र कामगिरी आहे.
तरुणांसमोर आदर्श !
प्रज्ञानंदचा जेवढा खेळ प्रगल्भ आहे, तेवढेच त्याचे विचारही प्रगल्भ आहेत. कार्लसन यांच्यावर मिळवलेल्या विजयानंतर एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने प्रज्ञानंद याची मुलाखत घेतली. त्यात तो म्हणाला की, या स्पर्धेसाठी मी फार मेहनत घेतली आहे. ही ऑनलाईन स्पर्धा भारतीय वेळेनुसार रात्री १० वाजता चालू होऊन पहाटे ४ वाजता संपते. त्यामुळे गेल्या १० दिवसांपासून मी पहाटे ३ वाजेपर्यंत जागून सराव करत आहे.’ इतक्या लहान वयात त्याची ही चिकाटी वाखाणण्याजोगी आहे. ध्येय निश्चित असेल, तर कष्टाचा त्रास होत नाही, हे त्याने कृतीतून दाखवून दिले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कार्लसनवरील विजयाच्या आदल्याच दिवशी त्याने ४ पैकी ३ सामने गमावले होते. त्याचे कुठलेही दडपण न घेता किंवा पराभवामुळे खचून न जाता त्याने दुसर्या दिवशीच्या सामन्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. पराभवातून शिकून त्याने नव्या उत्साहाने पुढच्या सामन्याची सिद्धता चालू केली. आदल्या दिवशीच्या कटू आठवणी तो पूर्णपणे विसरला आणि आत्मविश्वासाने बुद्धीबळाच्या परीक्षेला सामोरे गेला. म्हणूनच दुसर्या दिवशीची पहाट त्याचा भाग्योदय करणारी ठरली. एकीकडे आजची युवापिढी मोठ्या संख्येने त्यांच्या जीवनातील अपयशामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकलेली दिसते. त्यातून ती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतांना दिसते. या सर्वांना त्यांच्याच वयाच्या प्रज्ञानंद याने ‘अपयशाच्या अंधःकारातून यशाची पहाट उगवतेच’, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे अपयश आले, तरी खचून न जाता सकारात्मकता, आत्मविश्वास, चिकाटी, चुकांतून शिकणे आणि प्रयत्नांची पराकाष्ठा, ही पंचसूत्री व्यक्तीला अगदी सर्वाेच्च यशाला गवसणी घालून देते, हेच प्रज्ञानंद याचा विजय सांगतो.
खरे तर असे यश मिळाल्यानंतर, तसेच सर्वत्र कौतुक झाल्यानंतर सर्वसाधारणपणे कुठलीही व्यक्ती हुरळून जाते; मात्र यालाही प्रज्ञानंद अपवाद ठरला. पृथ्वीतलावरील सर्वोत्तम बुद्धीबळपटूवर विजय मिळवल्यानंतर त्याला ‘तू आनंद साजरा करणार नाही का ?, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो उत्तरला ‘मी या विजयाचा आनंद साजरा करण्याऐवजी माझ्या या स्पर्धेतील पुढील सामन्यांवर लक्ष केंद्रित करत आहे.’ जगज्जेत्याला नमवूनही नम्र असणारा, क्षणिक विजयात रममाण न होणारा आणि अंतिम विजयाच्या ध्येयापासून विचलित न होणारा लहानसा प्रज्ञानंद विचारांनीही प्रगल्भ ठरतो तो यासाठीच. ‘अपयशाने खचून जायचे नाही आणि यशाने हुरळून जायचे नाही’, हा यशस्वी खेळाडूचा कानमंत्र त्याने भारतातील असंख्य तरुणांसमोर दिला आहे. प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊ न देता पाय भूमीवरच असलेला हा उदोयन्मुख खेळाडू भारताचे माजी ग्रॅण्डमास्टर जगज्जेते विश्वनाथन् आनंद यांच्याप्रमाणे बुद्धीबळ क्षेत्रात स्वतःचा दबदबा निर्माण करेल, यात शंका नाही. आपल्याकडे ‘१६ वे वरीस (वर्ष) धोक्याचे’ असे म्हटले जाते; परंतु ‘१६ वे वरीस हे विक्रम करण्याचे आहे’, हे आजच्या तरुणांनी प्रज्ञानंद याच्याकडून शिकले पाहिजे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी जगाला दिशा दाखवणारी आणि अखिल मानव जातीच्या उद्धाराचा मार्ग समृद्ध करणारी ज्ञानेश्वरी लिहिली, तीही १६ व्या वर्षीच ! त्यामुळे भारताला हा वारसा परंपरागत लाभलेला आहे.
हल्लीचे बहुतांश पालक त्यांच्या पाल्यांच्या भविष्याविषयी चिंताक्रांत असलेले आढळून येतात. आज घरोघरी ‘आमची मुले भ्रमणभाषच्या पुष्कळ आहारी गेली आहेत, ती सतत ‘व्हिडिओ गेम्स’ खेळत असतात, सतत टीव्ही बघत असतात, अभ्यास करत नाहीत, आमचे ऐकत नाहीत’, अशा पालकांच्या तक्रारी ऐकायला मिळतात. अशा पालकांनी प्रज्ञानंद याच्या आई-वडिलांचा आदर्श समोर ठेवायला हरकत नाही. प्रज्ञानंदची बहीण वैशाली हीसुद्दा अतीप्रमाणात टीव्ही पहात असे. तिला त्यापासून परावृत्त करण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी तिला बुद्धीबळाच्या शिकवणीवर्गात घातले. बहिणीसमवेत प्रज्ञानंदही या वर्गाला जात असे. कालांतराने या दोघांनाही चेन्नईतील ‘चेस गुरुकुल’ या नामवंत अकादमीत प्रवेश मिळाला आणि त्यांचे भाग्य उजळले. त्यामुळे पालकांनीही पराभूत मानसिकता त्यागून स्वतःच्या पाल्यांचा कल बघून त्यांत त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
देशी खेळांना प्रोत्साहन मिळावे !
आज जरी अनेक देश ‘बुद्धीबळ’ या खेळाचा शोध लावल्याचा दावा करत असले, तरी या खेळाचा आरंभ सर्वप्रथम भारतात झाला, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे या खेळाला राजाश्रय मिळाला पाहिजे. दुर्दैवाने आज आपल्या देशात एकीकडे क्रिकेटसारख्या विदेशी आणि अत्यंत खर्चिक खेळाचे स्तोम माजले असतांना दुसरीकडे बुद्धीबळ, कबड्डी, खो-खो यांसारखे खेळ शासकीय पातळीवर वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिले आहेत. त्यामुळे अशा देशी खेळांना जर खर्या अर्थाने राजाश्रय मिळाला, तर देशात अनेक ‘प्रज्ञानंद’ निर्माण होऊन देशाचे नाव उंचावतील !