ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सरकारी पैशांतून वैयक्तिक कामासाठी विमान दौरा केला ! – भाजप

मुंबई – ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दळणवळण बंदीच्या काळात सरकारी पैशांतून वैयक्तिक कामासाठी देशात विमान दौरा केल्याने या पैशांची वसुली त्यांच्याकडून करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे मुंबई विभागाचे माध्यमप्रमुख विश्वास पाठक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे.

‘या याचिकेवर सुनावणी हवी असेल, तर १० दिवसांत २ लाख रुपयांची अनामत रक्कम जमा करा, रक्कम जमा न केल्यास ही याचिका फेटाळून लावू’, अशी चेतावणी  न्यायालयाने पाठक यांना दिली आहे. गेल्या वर्षभरापासून ही याचिका प्रलंबित होती.

नितीन राऊत यांनी दळणवळण बंदीच्या काळात मुंबई, नागपूर, भाग्यनगर आणि देहली येथे अनेकदा विशेष विमानातून प्रवास केला होता. या प्रवासासाठी कर्जबाजारी असलेल्या वीज आस्थापनांना ४० लाख रुपयांचे देयक भरण्यास भाग पाडल्याचा आरोप पाठक यांनी याचिकेत केला आहे. याविषयी त्यांनी वीजनिर्मिती आणि वीजवितरण या आस्थापनांकडून माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीच्या आधारे ही याचिका केली.