जुन्नर (पुणे) – छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाने महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्म घेतला, हे या भूमीचे आणि भूमीपुत्रांचे भाग्य आहे. शिवजयंती महाराष्ट्रावर प्रेम करणार्या लाखो शिवभक्तांच्या आशा-आकांक्षांची आहे, त्यांच्या स्वप्नपूर्तीची आहे, तसेच महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढलेल्या लाखो मावळ्यांच्या शौर्याची, त्यागाची आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. ते किल्ले शिवनेरीवरील शिवजन्मोत्सव कार्यक्रमात बोलत होते. या वेळी राज्यातील मंत्री, विविध पदाधिकारी आणि शिवप्रेमी उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणाकरता न्यायालयात काही अडचणी आल्यावर आयोगाची स्थापना झाली. त्यानंतर ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यामुळे फेटाळण्यात आले. केंद्र सरकारने कायद्यामध्ये पालट करण्याची आवश्यकता आहे; परंतु तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या विचाराने मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल; मात्र अगोदरच्या आरक्षणांना धक्का न लावता आणि नियमांच्या चौकटीत हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे.