सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष, तसेच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांसह अन्यांवर गुन्हा नोंदवण्याचा विशेष पॉक्सो न्यायालयाचा आदेश !

 ‘नाय वरन भात लोन्चा….’ चित्रपटात महिला आणि लहान मुले यांच्या संबंधांचे अश्लील आणि बीभत्स चित्रण केल्याचे प्रकरण !

चित्रपटातील समाजविघातक दृश्यांना कात्री लावण्याचे काम चित्रपट परीनिरीक्षण मंडळाचे आहे. हे मंडळ त्याचे दायित्व योग्यरित्या पार पाडत नसल्यामुळे न्यायालयात अशी प्रकरणे नेऊन लोकांना आवाज उठवावा लागतो, हे संतापजनक !

मुंबई – सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष, तसेच ‘नाय वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांसह चित्रपट निर्माते नरेंद्र हिरावत अन् श्रेयस हिरावत, सहनिर्माते विजय शिंदे, तसेच चित्रपट निर्मात्या आस्थापनांशी संबंधित व्यक्ती यांवर गुन्हा नोंदवण्याचा आदेश विशेष पॉक्सो न्यायालयाने दिला आहे. या चित्रपटात महिला आणि लहान मुले यांच्यातील संबंधांचे आक्षेपार्ह अन् बीभत्स चित्रण दाखवल्याच्या प्रकरणी न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.

या याचिकेवर नुकतीच विशेष न्यायाधीश एन्.एस्. शेख यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणी चित्रपट परीनिरीक्षण मंडळाच्या (‘सेन्सॉर बोर्डा’चे) अध्यक्षांवरही गुन्हा नोंदवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.