पेडणे, २० फेब्रुवारी (वार्ता.) – मोपा विमानतळ प्रकल्पाकडे जाण्यासाठी जोडरस्ता (लिंक रोड) सिद्ध करण्याच्या प्राथमिक कामाला प्रारंभ झाला आहे. सरकार आणि विमानतळाचे बांधकाम करणारे आस्थापन कोणतीही संवेदना नसल्याप्रमाणे या भागातील बहरलेली काजू आणि आंबा यांची मोठी झाडे थेट बुलडोझर घालून खड्डे खणून भूमीत गाडत आहेत. झाडे कापण्यासाठी अनुज्ञप्ती न घेता आणि झाडे कापण्यास स्थानिक भूमीमालकाच्या हरकती असतांना झाडे कापून टाकली जात आहेत. ही झाडे आणि भूमी वाचवण्यासाठी तुळसकरवाडी, वारखंड, पेडणे भागातील पीडित शेतकर्यांनी आंदोलन करून या कृतीवरून सरकारचा निषेध केला आहे.
पीडित शेतकर्यांच्या मते सरकारने जोडरस्ता बांधकामासाठी अधिकाराचा वापर करून शेतकरी आणि संबंधित कुळ यांना विश्वासात न घेता भूमी कह्यात घेतल्या आहेत. रस्ता बांधकामास अडथळा येत असल्याने काजू, आंबा आणि सागवान यांची लाखो झाडे कापली जात आहेत. झाडे कापण्यात येत असलेल्या ठिकाणी अनेक पाण्याचे झरे आहेत. झाडांची बेसुमार कापणी करण्यात येत असल्याने झरे, पर्यावरण आणि जैवविविधता यांना धोका निर्माण झाला आहे. झाडे कापल्याने जंगली प्राणी, कीटक आणि पक्षी यांच्यावर संकट आले आहे. यासाठी राज्यातील पर्यावरणप्रेमींनी झाडे आणि भूमी वाचवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मोपा विमानतळ आणि मोपा विमानतळासाठी जोडरस्ता बांधकाम यांच्यासाठी भूमी दिलेल्यांना अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही. संबंधितांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘मोपा विमानतळ पंचक्रोशी पीडित जन संघटने’ने चळवळ उभारली आहे. याचाच एक भाग म्हणून २० फेब्रुवारी या दिवशी शेतकर्यांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करून सरकारचा निषेध केला. ‘न्याय मिळेपर्यंत आंदोलन चालूच रहाणार आहे. आमची जेवढी भूमी गेली आहे त्या भूमीतील उत्पन्नाची हानीभरपाई आणि तेवढीच भूमी केवळ आमच्या पेडणे तालुक्यातच आम्हाला सरकारने द्यावी.’, असे पीडित महिलांनी पत्रकारांना सांगितले.
निवडणुकीतील उमेदवार गेले कुठे ?
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांचे उमेदवार आमच्या घरी मते मागण्यासाठी आले होते. मागच्या वर्षापासून मोपा विमानतळासंबंधी पीडित शेतकर्यांनी उभारलेल्या आंदोलनात काँग्रेसचे उमेदवार तथा अधिवक्ता जितेंद्र गावकर यांचा सातत्याने पाठिंबा लाभत आहे; मात्र निवडणुकीत उभे असलेले अन्य उमेदवार आमच्यावर संकट आलेले असतांना आता गेले कुठे ?, असा प्रश्न पीडित शेतकर्यांनी केला आहे.