लंडनच्या हिथ्रो विमानतळावर ‘युनिस’ वादळाच्या काळात विमान यशस्वीपणे खाली उतरवणार्‍या वैमानिकांचे होत आहे कौतुक !

एअर इंडियाचे विमान यशस्वीपणे खाली उतरताना

लंडन (ब्रिटन) – येथील विमानतळावर ‘युनिस’ वादळामुळे विमान उतरवण्यास प्रचंड कठीण झाले असतांना एअर इंडियाची २ विमाने अगदी सराईतपणे खाली उतरवल्यावरून या विमानांच्या भारतीय वैमानिकांचे कौतुक केले जात आहे. यांपैकी एका वैमानिकाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. इतर अनेक विमाने धावपट्टीवर उतरू शकली नाहीत, तसेच अनेक उड्डाणेही रहित करावी लागली. अशात भारतीय वैमानिकांना हे यश मिळाले.

या वादळाच्या काळात भारताची २ विमाने हिथ्रो विमानतळावर यशस्वीपणे खाली उतरली. एक भाग्यनगर येथून, तर दुसरे गोव्यातून आले होते. या दोन्ही विमानांनी पहिल्याच प्रयत्नात विमान उतरवले. एकाचे वैमानिक अंचित भारद्वाज होते, तर दुसर्‍या विमानाचे आदित्य राव हे वैमानिक होते.