१. देहातील उष्णता न्यून करण्यासाठी शारीरिक स्तरावर करायचे उपाय
१ अ. तुळशीचे बी पोटात घेणे
तुळशीची पाने उष्ण, तर तुळशीचे बी थंड असते. शरिरातील उष्णता न्यून करण्यासाठी तुळशीचे १ चमचा बी अर्धी वाटी पाण्यात ३ घंटे भिजत घालावे आणि त्यामध्ये १ वाटी कोमट दूध घालून सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. असे ७ दिवस करावे.
१ आ. दूर्वांचा रस पिणे
दूर्वा पुष्कळ प्रमाणात शीतल असतात. त्यामुळे दिवसातून २ – ३ वेळा दूर्वांचा रस काढून तो प्यावा.
१ इ. वाळा घातलेले पाणी पिणे
पाण्यामध्ये वाळा घालून ते पाणी दिवसभरात तहान लागेल तेव्हा प्राशन करावे.
१ ई. पाण्यात सब्जा किंवा वेलची घालून पिणे
पाण्यामध्ये सब्जा किंवा वेलची सोलून घालावी आणि ते पाणी दिवसभरात तहान लागेल, तेव्हा प्राशन करावे.
१ उ. पाण्यामध्ये धने भिजवून ते पाणी प्राशन करणे
धन्याचे सेवन केल्याने देहातील शीतलता वाढते. त्यामुळे पाण्यामध्ये धने भिजवून ते पाणी दिवसभरात तहान लागेल तेव्हा प्राशन करावे.
१ ऊ. गुलकंदाचे सेवन करणे
गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद बनवतात. गुलाबाच्या पाकळ्या शीतल असल्यामुळे उष्णता वाढल्यावर कोमट दुधामध्ये गुलकंद घालून त्याचे प्राशन सकाळी रिकाम्या पोटी करावे. गुलकंदाच्या ऐवजी गुलाबाचे सरबतही बनवून ते घेऊ शकतो.
१ ए. जेवणामध्ये ताक घेणे
जेवणामध्ये देशी गायीच्या दुधापासून बनवलेले ताक प्यावे. गायीचे दूध उपलब्ध होत नसेल, तर म्हशीच्याही दुधापासून बनवलेले ताक दिवसातून १ वेळा दुपारच्या जेवणावर नियमितपणे सेवन करावे. काही जणांना ताक घेऊन त्रास वाढू शकतो. अशांनी त्रास वाढल्यास ताक बंद करावे.
१ ऐ. डोळ्यांवर काकडी किंवा बटाटा कापून त्यांच्या चकत्या ठेवणे
उष्णतेमुळे डोळ्यांची आग होत असेल, तर डोळ्यांवर काकडी किंवा बटाटा कापून त्यांच्या चकत्या १५ – २० मिनिटे ठेवाव्यात. हा उपाय दिवसातून २ – ३ वेळा करावा.
१ ओ. तळपायांना गोपीचंदन किंवा चंदन यांचा लेप लावणे
देहातील उष्णता तळपायांतून बाहेर पडत असते. गोपीचंदन किंवा चंदन शीतल असल्यामुळे उष्णता वाढल्यावर त्यांचा लेप तळपायांना दिवसातून २ – ३ वेळा लावावा आणि तो किमान ३० मिनिटे ठेवावा.
१ औ. तळपायांना मेंदी लावणे
तळपायांना मेंदी लावावी.
१ अं. तळपायांना तेल लावून काशाच्या वाटीने मालीश करणे
तळपायांना खोबरेल तेल लावून काशाच्या वाटीने दिवसातून किमान १ वेळा आणि अधिकाधिक ३ – ४ वेळा तळपायांना मालीश केल्यावर देहातील उष्णता काशाच्या वाटीमध्ये खेचली जाते.
पोटातून औषध घेण्याचे वरील आयुर्वेदीय उपचार अधिकाधिक १५ दिवस करून पहावेत. हे उपचार केल्यावरही त्रास न्यून होत नसेल, तर स्थानिक वैद्यांचा समादेश घ्यावा.
२. देहातील उष्णता न्यून करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर करायचे उपाय
२ अ. नामजप
२ अ १. आपतत्त्वाची मुद्रा करून वरुणदेवाचा नामजप करणे किंवा ‘वं’ हा बीजमंत्र म्हणणे : अनामिका हे बोट आपतत्त्वाशी संबंधित आहे. त्यामुळे देहातील उष्णता वाढल्यावर अंगठ्याचे टोक अनामिकेच्या टोकाला किंवा मूळाशी लावून आपतत्त्वाची मुद्रा करून ‘श्री वरुणाय नम : ।’ हा नामजप किमान अर्धा घंटा करावा. वरुणदेवता आपतत्त्वाची देवता असल्यामुळे तिचा नामजप आणि ‘वं’ हा बीजमंत्र आपतत्त्वाशी संबंधित असल्यामुळे हा बीजमंत्र किमान अर्धा घंटा म्हटल्याने देहातील तेजतत्त्व न्यून होऊन आपतत्त्व वाढू लागते. त्यामुळे देहातील उष्णता उणावून शीतलता वाढते.
२ अ २. देवतांच्या तारक रूपाचा नामजप करणे आणि रामनामाचा जप करण्याचे आध्यात्मिक महत्त्व : देवतांच्या तारक रूपाच्या नामजपातून तारक शक्ती आणि मारक रूपाच्या जपातून मारक शक्ती प्रक्षेपित होत असते. तारक शक्तीची स्पंदने शीतल, तर मारक शक्तीची स्पंदने उष्ण असतात. त्यामुळे देहातील उष्णता वाढल्यावर देवतांच्या तारक रूपाचा नामजप किमान १ घंटा करावा. सर्व देवतांच्या नामजपांपैकी प्रभु श्रीरामाच्या तारक रूपाचा नामजप किमान १ घंटा केल्यास देहाला शीतलता आणि मनाला शांती लाभते. समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा शिवाने हलाहल (विष) प्राशन केले होते, तेव्हा त्याच्या देहाची लाही लाही होत होती. तेव्हा शिवाने देहाचा ताप शांत करण्यासाठी माथ्यावर चंद्र, जटेमध्ये गंगा, देहावर नऊ नाग आणि भस्मलेपन केले, तरीही शिवाचा ताप म्हणजे देहाला होणार दाह शांत होत नसल्यामुळे शिवाने प्रभु श्रीरामाचा ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप चालू केला. त्यामुळे शिवाच्या देहाला होणारा दाह शांत झाला.
श्रीविष्णूच्या सहस्रनामांपैकी श्रीरामाचे नाम हे सर्वश्रेष्ठ आहे. ३ वेळा उच्चारलेले श्रीरामाचे नाम हे श्रीविष्णुसहस्रनामाच्या तुल्यबळ आहे.
२ आ. देहातील सूर्यनाडी बंद करून चंद्रनाडी चालू होण्यासाठी प्राणायाम आणि अन्य उपाय करणे
जेव्हा व्यक्तीची सूर्यनाडी चालू होते, तेव्हा तिच्या देहातील उष्णता वाढते. उजवी नाकपुडी ही सूर्यनाडीचे, तर डावी नाकपुडी चंद्रनाडीचे प्रतीक आहे. डाव्या नाकपुडीने ५- १० मिनिटे श्वास घेऊन तो डाव्या नाकपुडीनेच सोडण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे व्यक्तीची चंद्रनाडी चालू होते. त्याचप्रमाणे १५ – २० मिनिटे उजव्या कुशीवर झोपल्यामुळे सूर्यनाडी बंद होऊन चंद्रनाडी चालू होते. त्यामुळे देहातील उष्णता उणावते.
२ इ. मीठ पाण्यात पाय बुडवून उपाय करणे
देहामध्ये त्रासदायक शक्ती साठल्यामुळेही देहाची उष्णता वाढते. अशा वेळी १५ ते २० मिनिटे मीठपाण्यात पाय बुडवून बसावे. त्यामुळे देहातील त्रासदायक शक्ती मीठपाण्यात खेचली जाऊन देहातील उष्णता न्यून होण्यास साहाय्य होते.
२ ई. रिकाम्या खोक्याचे उपाय करणे
२ ई १. तोंडासमोर रिकामे खोके धरणे : तोंडामध्ये उष्णता वाढल्यास तोंड उघडून त्याच्यासमोर रिकामे खोके १५ ते २० मिनिटे धरावे. त्यामुळे तोंडात साठलेली त्रासदायक शक्ती रिकाम्या खोक्यात खेचली जाऊन देहातील उष्णता उणावते.
२ ई २. रिकाम्या खोक्यात पाय ठेवून बसणे : उष्णतेमुळे तळपायाची आग होत असेल, तर मोठ्या आकाराच्या रिकाम्या खोक्यामध्ये दोन्ही पाय घालून २० ते ३० मिनिटे बसावे. त्यामुळे खोक्यातील पोकळीमध्ये पायातील त्रासदायक शक्ती किंवा उष्णता खेचली जाऊन देहातील उष्णता उणावते.
३. संगीतातील केदार, मालकंस आणि अमृतवर्षिणी हे राग ऐकणे
आपतत्त्वाशी ‘मेघमल्हार’ संबंधित आहे. ‘केदार आणि मालकंस हे राग शिवतत्त्वाशी संबंधित आहेत. अमृतवर्षिणी हा राग कर्नाटकी राग आहे. तो आपतत्त्वाशी संबंधित आहे.’ – सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत विशारद, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.)
केदार आणि मालकंस या रागांमध्ये शिवतत्त्व कार्यरत आहे. हे तत्त्व निर्गुण स्वरूपाचे असून ते आकाशतत्त्वाशी संबंधित आहेत. देहातील उष्णता ही तेजतत्त्वाशी संबंधित असते. त्यामुळे जेव्हा देहातील तेजतत्त्व वाढल्यावर देहातील उष्णता वाढते, तेव्हा आकाशतत्त्वाशी संबंधित असणारे ‘केदार आणि मालकंस’ अन् आपतत्त्वाशी संबंधित असणारा ‘मेघमल्हार’ या रागांतील संगीत गायन किंवा वादन यांचे संगीत १५ ते २० मिनिटे ऐकल्यावर देहातील आकाश किंवा आप तत्त्व वाढून तेजतत्त्वाचे प्रमाण न्यून होते. त्यामुळे देहात वाढलेली उष्णता उणावून शीतलता वाढते. व्यक्तीच्या प्रकृतीनुसार तिला विविध प्रकारचे उपाय लागू होत असतात. त्यामुळे काही जणांना शिवतत्त्वाशी, म्हणजे आकाशतत्त्वाशी आणि काही जणांना आपतत्त्वाशी संबंधित असणारे राग ऐकल्यावर त्यांना लाभ होऊन त्यांची उष्णता न्यून होते.’
कृतज्ञता
‘देवाच्या कृपेने देहातील उष्णता उणावण्यासाठी शारीरिक आणि आध्यात्मिक स्तरांवर वरील उपाय सुचले’, यासाठी मी देवाच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१.२०२२)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. |