सरकारीकरण झालेल्या मंदिरात भाविकांचा विचार न होता समितीच्या उत्पन्नाचा विचार अधिक होतो, हे लक्षात घ्या. त्यामुळेच मंदिरे भक्तांच्या कह्यात असणे आवश्यक आहे.
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथील श्री विठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी असलेल्या नामदेव पायरीचे दर्शन भाविक मोठ्या श्रद्धेने घेतात; मात्र या ठिकाणी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भली मोठी आणि उंच दक्षिणा पेटी ठेवली आहे, त्यामुळे भाविकांना दर्शन घेतांना अडचण येते. ही दानपेटी अन्यत्र हलवण्याची मागणी राष्ट्रवादी ओबीसीचे अनिल सप्ताळ यांनी करूनही, त्यावर काही कारवाई झालेली नाही. ‘दानपेटी हलवल्यास समितीच्या उत्पन्नात घट होईल’, असे मंदिर समितीने सांगितले आहे.
येथील श्री विठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या पायरीवर संत नामदेव महाराजांसह १४ संतांनी सदेह समाधी घेतली. त्या पायरीला नामदेव पायरी असे म्हटले जाते.
दानपेटीमुळे दर्शनास अडचण येत असल्याने ती अन्यत्र हलवण्यात यावी ! – भाविक
दानपेटीमुळे नामदेवांच्या मूर्तीचे दर्शन होत नाही. भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन मिळाले नाही; मात्र नामदेव पायरीचे दर्शन झाले तरी समाधान वाटते; परंतु उंच असलेल्या दानपेटीमुळे दर्शन घेता येत नाही. त्यामुळे तेथे ठेवण्यात आलेली दानपेटी अन्यत्र हलवण्यात यावी.