१ सहस्र ७८० सातबारा उतारे रहित
रत्नागिरी – शहरांमधील जमीन खरेदी-विक्री व्यवहारात होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रॉपर्टी कार्ड (मिळकत पत्र) देण्याचा निर्णय भूमी अभिलेखने घेतला आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील ८ मुख्य शहरांमधील एकूण १ सहस्र ८८३ सातबारांपैकी जानेवारी २०२२ अखेर १ सहस्र ७८० सातबारा उतारे रहित केले आहेत.
राज्यात ज्या शहरांमध्ये ‘सिटी सर्व्हे’चे काम झाले आहे, तेथील मिळकतींचे सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड अशी दोन्ही चालू ठेवण्यात आले. ‘सिटी सर्व्हे’ झालेल्या शहरांमध्ये सातबारा बंद करून तेथे फक्त ‘प्रॉपर्टी कार्ड’ चालू ठेवण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. भूमी अभिलेखने नगरपालिका आणि नगरपरिषद हद्दीत सर्व मिळकतीचे ‘प्रॉपर्टी कार्ड’ सिद्ध केले आहे. त्या जागेचे सातबारा उतारे बंद केलेले नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी जागांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या वेळी सोयीनुसार सातबारा उतार्यांचा वापर केला जातो. त्यातून फसवणुकीचे प्रकार घडू शकतात.
जिल्ह्यातील शहर हद्दीतील सर्व सातबारे रहित करण्याची कार्यवाही चालू झाली आहे. भूमी अभिलेखकडे शहरी विभागात १ सहस्र ८८३ एकूण सातबारा नोंद आहेत. त्यापैकी ३१ जानेवारीपर्यंत आतापर्यंत तहसीलदार विभाग स्तरावर १ सहस्र ७८० सातबारा उतारे रहित केले आहेत. अजूनही ९५ उतारे रहित करणे बाकी आहेत. त्यात रत्नागिरी शहरातील ४७, चिपळूण शहरातील ४४, गुहागर शहरातील ३, खेडमधील १ इतक्या उतार्यांचा समावेश असल्याचे भूमी अभिलेख कार्यालयाकडून सांगण्यात आले. लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड आणि दापोली ही शहरे सातबारामुक्त बनली आहेत.