चिपळूण आणि संगमेश्‍वरमधील रखडलेल्या नळपाणी योजनांची अंदाजपत्रके तातडीने सिद्ध करावीत ! – राज्यमंत्री संजय बनसोडे

जलजीवन मिशनच्या अंतर्गत चालू असलेली कामे होत आहेत संथगतीने …

बैठकीला संबोधित करतांना राज्यमंत्री संजय बनसोडे

चिपळूण – चिपळूण-संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघातील ‘जलजीवन मिशन’च्या अंतर्गत चालू असलेली कामे अतिशय संथ गतीने चालू आहेत. योजनेत येणार्‍या अडचणी दूर करून त्या मार्गी लावण्याची मागणी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी केली होती. या मागणीनुसार राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी रखडलेल्या नळपाणी योजनांची अंदाजपत्रके तातडीने सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संगमेश्‍वर तालुक्यातील तांत्रिकदृष्ट्या आराखड्यात समावेश नसलेली ६४ गावे आणि चिपळूण तालुक्यातील २१ गावे यांना येणार्‍या आर्थिक वर्षामध्ये समाविष्ट करून तातडीने अंदाजपत्रक सिद्ध करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. याविषयीची बैठक मंत्रालयात १५ फेब्रुवारीला घेण्यात आली होती. या वेळी नळपाणी योजनेच्या कार्यवाहीत येणार्‍या अडचणी आमदार निकम यांनी मांडल्या होत्या.

या बैठकीत मंत्री बनसोडे म्हणाले, ‘‘आराखड्यातील संमत योजनांसाठी अंदाजीय रकमेपेक्षा अधिकचा निधी लागत असल्यास तो उपलब्ध करून दिला जाईल.’’

बैठकीतील सूत्रे

१. पूर्वीच्या नळपाणी योजनेच्या विहिरी, टाक्या यांची नोंद नसल्यामुळे त्यांची जिल्हाधिकार्‍यांमार्फत नोंद करून घेणेसंदर्भात चर्चा करण्यात आली.

२. संगमेश्‍वर तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील अंत्रवली, कळंबस्ते, फणसवणे, उमरे या गावांच्या ११ कोटी ९१ लाख रुपयांचे अंदाजपत्रक असलेल्या योजनेस तातडीने संमती देण्याविषयी सूचना करण्यात आल्या.

३. धनगर वाड्यामध्ये मापदंडामध्ये बसत नसणार्‍या योजनांना शासन स्तरावर संमती देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचे सांगण्यात आले.