दोषी संचालक आणि अधिकारी यांच्याकडून वसुली होणार !

पुणे येथील रूपी बँक अपहार प्रकरण

पुणे – रूपी को-ऑप. बँकेस तत्कालीन संचालक आणि अधिकारी यांच्यामुळे झालेल्या आर्थिक हानीची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी, असे आदेश राज्य सरकारने अपिलावरील सुनावणीच्या वेळी दिले आहेत. बँकेच्या तत्कालीन संचालक आणि अधिकारी यांच्यावर १ सहस्र ३२७ कोटी रुपयांचे दायित्व निश्चित करण्यात आले असून, त्यांची जप्त केलेली जंगम अन् स्थावर मालमत्ता विक्री करून ही रक्कम वसूल करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे वसुली अधिकारी तथा सहकार उपनिबंधक मधुकांत गरड यांनी दिली आहे.

रूपी बँकेतील आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारापोटी सहकार कायद्याच्या कलम ८८ नुसार चौकशीमध्ये बँकेचे संचालक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून १ सहस्र ४९० कोटी रुपये वसुलीविषयी सहकार विभागाने २ फेब्रुवारी २०१६ मध्ये आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध तत्कालीन संचालक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहकार मंत्र्यांकडे अपील केले होते. त्यावर सुनावणीवेळी वरील निर्णय दिला आहे.