केंजळ (सातारा) येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याचे प्रकरण
सातारा, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – वाई तालुक्यातील केंजळ या गावी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन केला; म्हणून ३६ युवकांवर भुईज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत २८ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले असून त्यातील २२ जणांना २ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. ११ फेब्रुवारीच्या रात्री केंजळ गावातील युवकांनी ग्रामपंचायत परिसरामध्ये चबुतरा बांधून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा स्थापन केला होता. यासाठी कोणतीही अनुमती घेण्यात आलेली नव्हती. याची माहिती मिळताच रीतसर अनुमती घेऊन पुतळा स्थापन करावा, अशी भूमिका प्रशासनाने घेतली; मात्र युवक आणि ग्रामस्थ त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. १२ फेब्रुवारीला पोलीस बंदोबस्तामध्ये प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवला.
वाई पोलीस न्यायालयाच्या आदेशाचे पालन कधी करणार ?वाई तालुक्यातील प्रतापगड येथे अफझलखान कबर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले आहे. याविषयी ‘प्रतापगड उत्सव समिती’ने प्रदीर्घ स्वरूपाचा न्यायालयीन लढा दिला सून त्याला यश आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिलेले आहेत; मात्र शांतताप्रिय समाजाच्या भावना दुखावल्या जातील आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल हे कारण पुढे करत सातारा पोलीस मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नाही; परंतु केंजळ या गावात विनाअनुमती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, तर पोलीस प्रशासन तत्परतेने कारवाई करते. याला पोलिसांची मोगलाई म्हणायचे का ? प्रतापगडावरील अफझलखान कबरीच्या परिसरातील अनधिकृत बांधकाम पाडून पोलीस न्यायालयाच्या आदेशाचे पालन कधी करणार ? असा प्रश्न स्थानिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित करत आहेत. |