मुंबई – जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नोंदवण्यात आलेला गुन्हा रहित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने ५ दोषी युवकांना वृद्धाश्रमात सेवा करण्याची शिक्षा दिली आहे. पहिल्या आणि तिसर्या रविवारी याप्रमाणे ६ मास पुणे येथील निवारा वृद्धाश्रमात या युवकांना सेवा करावी लागणार आहे. न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या खंडपिठाने हा निर्णय दिला.
या युवकांनी त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला ‘ऑनलाईन गेमिंगमध्ये अधिक पैसे मिळवून देतो’, असे आमिष दाखवून फसवले. स्वत:चे पैसे मागण्यासाठी आल्यावर त्या व्यक्तीला युवकांनी जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पुणे येथील वानवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदाराच्या संमतीने या युवकांवरील हे प्रकरण मिटवले आहे; मात्र फौजदारी गुन्हा नोंद झाल्यामुळे या युवकांची नोकरी गेली आहे, तसेच नवीन नोकरी मिळत नाही. त्यामुळे गुन्हा रहित व्हावा, यासाठी या युवकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने या युवकांना वृद्धाश्रमात सेवा करण्याची शिक्षा देतांना झटपट पैसे मिळण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या तक्रारदारालाही हीच शिक्षा दिली आहे.