नारायण राणे यांची पत्रकार परिषद
मुंबई – संजय राऊत शिवसेना वाढवत नाही. ते शिवसेनेचे नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यांना सुपारी मिळाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर त्यांचा डोळा आहे. संजय राऊत यांनी प्रथम स्वतःवरील कारवाईविषयी उत्तर द्यावे, अशी टीका भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर एका पत्रकार परिषदेत केली.
राणे पुढे म्हणाले,
१. प्रवीण राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे दिलेल्या जबाबामुळे संजय राऊत यांचा तोल गेला आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी नाही, तर स्वत: अडचणीत आल्यामुळे राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली.
२. संजय राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्यांनी ३०० कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला. अंमलबजावणी संचालनालयाने राऊत यांना अटक करून याविषयी चौकशी करावी.
३. पत्रकार परिषदेपूर्वी ‘भाजपच्या साडेतीन जणांना अटक होणार’, असे संजय राऊत यांनी सांगितले होते; मात्र त्यांतील एकाचेही नाव त्यांनी सांगितले नाही.
४. राऊत हे ‘लोकप्रभा’ या मासिकात पत्रकार असतांना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात अनेक लेख लिहिले होते.
५. महाविकास आघाडी स्थापन करतांना उद्धव ठाकरे शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले, तेव्हा त्यांच्यासमवेत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे होते. त्या वेळी शरद पवार यांनी संजय राऊत यांना ‘तुलाच पदावर बसवतो’, असे सांगितले होते.