पेठेतील नागरिक आणि शिवभक्त मिरवणूक काढण्यावर ठाम !
कोल्हापूर – कोरोनाचा संसर्ग अल्प झालेला असल्यामुळे येथील शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी या दिवशी परंपरेनुसार मिरवणूक काढण्यात येईल, असे मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी सांगितले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिवजयंती उत्सवाच्या संदर्भात घोषित केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ‘शिवज्योत’ घेऊन जाण्यासाठी २०० जणांना आणि शिवजयंती उत्सवासाठी ५०० जणांना अनुमती देण्यात आली आहे; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या दिवशी प्रभात फेरी, ‘बाईक रॅली’ आणि मिरवणूक काढण्यावर बंदी असणार आहे.
कोरोनाच्या तिसर्या लाटेचा संसर्ग अल्प असला, तरी अजूनही प्रतिबंधात्मक नियम लागू आहेत, गर्दीमुळे पुन्हा संसर्ग वाढू नये, यांसाठी जिल्हाधिकार्यांनी मार्गदर्शक सूचना घोषित केल्या आहेत. अनेक शिवप्रेमी शिवनेरी, तसेच अन्य गड-दुर्गांवर जाऊन किंवा शहरात १८ फेब्रुवारीला मध्यरात्री १२ वाजता एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात; मात्र यंदा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊ नये. मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रम न घेता केबल किंवा ‘ऑनलाईन’ प्रक्षेपण करावे. आरोग्यविषयक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.