वेगळे ‘कॅनव्हासचे शूज’ घातल्याने पुणे येथील ‘दस्तुर स्कूल’ने मुलांना घरी पाठवले !

शाळेने पालकांची अडचण समजून घेतली का ? क्षुल्लक कारणांसाठी शाळा अशा प्रकारे मुलांना वेठीस धरत असेल, तर मुलांच्या मनात शाळेची प्रतिमा काय रहाणार ? शाळा व्यवस्थापनाने याचा गांभीर्याने विचार करावा, ही अपेक्षा ! – संपादक 

पुणे – शाळेने गणवेशामध्ये नेमून दिलेले ‘शूज’ न मिळाल्याने वेगळे ‘कॅनव्हासचे शूज’ (बूट) घालून शाळेत गेलेल्या ११ वीतील २० ते २५ मुला-मुलींना येथील ‘दस्तुर स्कूल’ने सकाळी शाळेत घेतले नाही. त्यांना काही वेळ दरवाजा बाहेर थांबवले आणि त्यानंतर शाळेत न घेता घरी पाठवून दिले.

या प्रकाराने संतप्त पालक म्हणाले, ‘‘आम्ही ६ सहस्र ५०० रुपये व्यय करून नवीन गणवेश घेतला आहे; पण शाळेने नेमून दिलेल्या दुकानातच बूट नाहीत. त्यामुळे दुसरे बूट घालून मुले शाळेत गेली होती. शिक्षणाला महत्त्व देण्याऐवजी शाळा केवळ या वस्तूतून मिळणार्‍या ‘कमिशन’पायी (परतावा) मुलांना वर्गात बसू देत नाही.’’ याविषयी ‘दस्तुर स्कूल’ची बाजू अद्याप समजली नाही.