संपादकीय
|
आज प्रत्येकच क्षेत्रात र्हास झालेला आपल्याला पहायला मिळतो. संगीतक्षेत्रही त्यास अपवाद नाही. त्याहीपुढे जाऊन पाश्चात्त्य संगीत तर एखाद्याच्या कसे जिवावर उठते, हे कळण्यास महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात नुकतीच घडलेली घटना पुरेशी बोलकी आहे. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील एक तरुण व्यसनांच्या आहारी गेला होता. त्यातून त्याचे शिक्षण सुटले आणि तो नैराश्यात गेला. नैराश्यात असतांना त्याने ‘ग्लुमी संडे’ (खिन्न रविवार) या मूळच्या हंगेरियन भाषेतील गाण्याचे हिंदीत भाषांतर केलेले गाणे ऐकले. हे गाणे ऐकल्यानंतर त्याचे उरलेसुरले मानसिक संतुलनही ढासळले. हे गाणे ऐकल्यापासून त्याच्या मनात सातत्याने आत्महत्येचे विचार येऊ लागले. इतके की, त्याच्या कुटुंबियांना त्याला उपचारांसाठी मानसोपचारतज्ञांकडे न्यावे लागले. मानसोपचारतज्ञ डॉ. रामेश्वर बोले हे आता त्याचे समुपदेशन करत आहेत. या गाण्याचा त्या तरुणाच्या मनावर इतका खोलवर परिणाम झाला आहे की, आताही या गाण्याची केवळ धून वाजली, तरीही त्याला दरदरून घाम येतो आणि तो ओरडायला लागतो. या अजब घटनेविषयी डॉ. बोले यांनीसुद्धा ‘नैराश्यग्रस्त असणार्या किंवा अगोदरच मनात आत्महत्येसारखे विचार येत असलेल्या व्यक्तीने हे गाणे ऐकल्यानंतर त्याच्या मनात नैराश्य आणि आत्महत्येचे विचार बळावू शकतात. त्यामुळे अशा लोकांनी हे गाणे ऐकू नये’, असा स्पष्ट सल्ला दिला आहे.
हे गाणे ऐकून आत्महत्येचे विचार येण्याची नांदेडमधील ही घटना काही पहिली आणि एकमेव नाही. यापूर्वी हे गाणे ऐकून विदेशात असंख्य लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. हंगेरीतील संगीतकार रेजसो सेरेस यांनी वर्ष १९३३ मध्ये हे गाणे रचले. हे गाणे प्रेमभंगावर आधारित असून ते ऐकणार्याच्या वेदना ताज्या होतात आणि त्याची पावले आत्महत्येकडे वळतात, असे सांगण्यात येते. परिणामी काही देशांत या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती; परंतु नंतर ती उठवण्यात आली.
प्राचीन भारतीय संगीताचे श्रेष्ठत्व !
सदर गाणे ऐकून आत्महत्येस प्रवृत्त होत असल्याविषयी आज जगभरात मतमतांतरे आहेत. तथापि या सगळ्या पार्श्वभूमीवर पाश्चात्त्य संगीताचा अघोरीपणा आणि भारतीय संगीतातील देवत्व मात्र प्रामुख्याने अधोरेखित होते. एखादी कला अवगत होणे, हे ईश्वरी कृपेविना अशक्यच असते. या ईश्वरी वरदानाचा उपयोग जर ईश्वरप्राप्ती करण्यासाठी केला, तरच खर्या अर्थाने मनुष्यजन्माचे सार्थक होते. हिंदु धर्मात ज्या १४ विद्या आणि ६४ कला सांगितल्या आहेत, त्यांपैकी संगीत एक आहे. हे संगीत (हल्लीचा धांगडधिंगा नव्हे) ईश्वरप्राप्तीचे माध्यम आहे. स्वप्तस्वरांच्या माध्यमातून व्यक्तीचा बाह्य जगताकडून ईश्वरप्राप्तीकडे प्रवास घडवण्याचे सामर्थ्य प्राचीन भारतीय संगीतात आहे. संतांचे अभंग, भजने, भक्तीगीते ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत मीराबाई अशा अनेक संतांच्या अभंगरूपी संगीतातूनच भक्तांना भगवंताची अनुभूती घेता आली आहे. हे पूर्वी घडत होते असे नाही, तर अगदी आजही घडत आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यात गीतरामायणाचा भव्य कार्यक्रम झाला. कार्यक्रम चालू असतांना मध्येच एका श्रोत्याने उभे राहून जाहीररित्या गीतरामायणाविषयी जी अनुभूती सांगितली, ती भारतीय संगीतातील देवत्व अधोरेखित करणारी आहे. त्या श्रोत्याच्या वयोवृद्ध वडिलांना त्या कार्यक्रमाला यायचे होते; परंतु त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना येता आले नाही. त्यामुळे त्या श्रोत्याने त्याच्या वडिलांना दूरभाषद्वारे गीतरामायण ऐकवले आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या वडिलांना बरे वाटू लागले. संगीत सामर्थ्याची ही सार्वजनिक पोचपावती होती. संगीताचे केवढे हे सामर्थ्य !
एकीकडे आपण ईश्वरप्राप्तीकडे नेणार्या अशा प्राचीन दैवी संगीताचा वारसा सांगत असतांना दुसरीकडे हल्लीचे आधुनिक संगीत मात्र समाजाला वेगाने अधोगतीकडे नेणारे आहे. हल्लीच्या कर्कश आवाजातील, काडीचाही अर्थ नसलेल्या किंवा अर्थहीन असलेल्या गाण्यांमुळे अगदी व्यक्ती आत्महत्येला प्रवृत्त होत नसली, तरी तिच्याभोवती नकारात्मक प्रभावळ निर्माण होते, हे वैज्ञानिक कसोटीवर संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. हे खरे भारतीय संगीत नाही. ‘शांत वाटले’, ‘उत्साह निर्माण झाला’, ‘भावजागृती झाली’ अशा अनुभूती देण्याची भारतीय संगीतात क्षमता आहे. इतकेच काय; पण शास्त्रीय संगीतात गायला जाणारा एक एक रागही सामर्थ्यवान आहे. राग गाऊन पाऊस पाडण्याचे सामर्थ्य केवळ भारतीय संगीतात आहे. भारतीय संगीत गाऊन पाऊस पडतो, तर पाश्चात्त्य गीते ऐकून माणूस आत्महत्येला प्रवृत्त होतो ! हाच दोन्हींतील मोठा भेद आहे. या अर्थाने पाश्चात्त्य गाण्यांना आसुरीच मानले गेले पाहिजे. या सर्वांतून भारतीय संगीताचे महत्त्व तर अधोरेखित होतेच; पण पाश्चात्य संगीतातील उथळताही दिसून येते.
राजाश्रय हवा !
आज भारत सोडला, तर सर्वत्र दर्जेदार संगीताची पोकळी आहे. ती भरून काढण्यासाठी भारत सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. आपल्याकडील १४ विद्या आणि ६४ कला या सातासमुद्रापार पोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आज जग आयुर्वेद, भारतीय संगीत, संस्कृती, अध्यात्म आदींविषयी भारताकडे मोठ्या आशेने पहात आहे. आयुर्वेदामुळे मुलीचा दृष्टीदोष जाऊन तिला नीट दिसू लागल्याने केनियाच्या माजी पंतप्रधानांनी नुकतेच भारताचे आभार मानणे, हे त्याचेच द्योतक आहे. या संधीचा भारताने लाभ करून घेतला पाहिजे. त्यासाठी सरकारला प्राचीन भारतीय संगीताला खर्या अर्थाने राजाश्रय द्यावा लागेल. त्याद्वारे भारतातच या संगीताचाचा प्रचार-प्रसार केला पाहिजे, तरच नांदेडसारखी घटना अन्यत्र कुठेही घडणार नाहीत. थोडक्यात, ज्याप्रमाणे श्री हनुमंताच्या लेखी ज्या मण्यांत राम नाही, तो मणी नाही. अगदी तसेच ज्या संगीतात ‘राम’ नाही, ते संगीत नाही, हेच खरे !