हंगेरियन गाणे ऐकून नांदेड येथील तरुणाच्या मनात आत्महत्येचा विचार आल्याने तरुणावर मानसोपचार चालू !

कुठे आत्महत्येस प्रवृत्त करणारे विदेशी संगीत, तर कुठे सकारात्मकता वाढवणारे दैवी भारतीय संगीत ! संगीताचा व्यक्तीवर केवळ मानसिकच नाही, तर आध्यात्मिक स्तरावरही परिणाम होतो. संगीताचा खरा लाभ मिळवण्यासाठी व्यक्तीने आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध संगीत ऐकणे आवश्यक आहे. भारतीय शास्त्रीय संगीत हे दैवी असून त्यात दैवी शक्ती आहे. भारतीय संगीत आणि नाद चिकित्सेतून व्याधी न्यून होतात, त्यासह व्यक्तीची सकारात्मकताही वाढते ! – संपादक

नांदेड – येथील मुदखेड तालुक्यातील एका तरुणाने नैराश्यात असतांना यू-ट्यूबवर हिंदी भाषेत भाषांतरित केलेले प्रेमभंगावर आधारित हंगेरिया देशाचे एक गाणे ऐकले आणि त्याचे मानसिक संतुलन बिघडले. गाणे ऐकल्यापासून त्याच्या मनात सारखे आत्महत्येचे विचार येऊ लागले. त्याच्यावर आता मानसोपचारतज्ञ उपचार करत आहेत; परंतु आताही या गाण्याची केवळ धून वाजली तरी, त्याला दरदरून घाम येतो. तो ओरडायला लागतो.

मानसोपचारतज्ञ डॉ. रामेश्वर बोले यांनी सांगितले की, नैराश्यग्रस्त असणार्‍या किंवा अगोदरच मनात आत्महत्येसारखे विचार येत असलेल्या व्यक्तीने हे गाणे ऐकल्यानंतर नैराश्य आणि आत्महत्या यांचे विचार बळावू शकतात. त्यामुळे अशा लोकांनी हे गाणे ऐकू नये.

काय आहे या गीताचा इतिहास ?

संगीतकार रेजसो सेरेस

हंगेरीतील संगीतकार रेजसो सेरेस यांनी वर्ष १९३३ मध्ये प्रेमभंगावर आधारित ‘ग्लुमी संडे’ नावाचे गाणे रचले. हे गाणे ऐकणार्‍याच्या वेदना ताज्या होतात. हे गाणे ऐकून अनेकांनी त्या काळात आत्महत्या केल्या होत्या. परिणामी या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती; परंतु नंतर ती उठवण्यात आली. त्यानंतर या गाण्याचे संगीत पालटण्यात (रिकंपोझ करण्यात) आले; परंतु तरीही आत्महत्येचे सत्र थांबले नाही.

‘हे गाणे ऐकल्यानंतर शरीराला इजा किंवा आत्महत्या करण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे स्वत:च्या दायित्वावर हे गीत ऐकावे’, अशी सूचना ‘गूगल’वरही या गाण्याच्या  ‘ऑडिओ’च्या खाली येते.