इराणच्या विरोधातील लढ्यात बहरीनला साहाय्य करू – इस्रायली पंतप्रधान बेनेट

इस्रायली पंतप्रधान नाफ्ताली बेनेट (उजवीकडे )

मनामा (बहरीन) – इराणच्या विरोधातील लढ्यात बहरीनला सर्वप्रकारे साहाय्य केले जाईल, असे इस्रायलचे पंतप्रधान नाफ्ताली बेनेट यांनी येथील ‘अल् अय्याम’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी सांगितले. बहरीनच्या भेटीवर आलेले बेनेट हे इस्रायलचे पहिलेच पंतप्रधान आहेत. ‘आम्ही इराणचा सामना करण्यास सिद्ध आहोत. या प्रदेशात शांती, सुरक्षा आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी मित्र देशांना साहाय्य करण्यात येईल’, असे बेनेट यांनी सांगितले. ‘टाइम्स ऑफ इस्रायल’ने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान बेनेट बहरीनचे राजे हमद बिन इसा अल् खलिफा आणि देशाचे राजपुत्र तथा पंतप्रधान सलमान बिन हमद अल् खलिफा यांची भेट घेऊन उभय राष्ट्रांतील विविध विषयांवर चर्चा करणार आहेत.

वर्ष २०२० मध्ये बहरीनने अब्राहम करारानुसार इस्रायलशी चांगले संबंध प्रस्थापित केले. इस्रायल आणि बहरीन इराणकडे एक शत्रुराष्ट्र म्हणून पहातात. बहरीनमधील सुन्नी राजवटीला इराणचा विरोध आहे. इराणचा बहरीनमधील शिया क्रांतीकारी गटाला गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृतरित्या पाठिंबा आहे.