हडपसर (पुणे) येथे शासकीय स्वस्त धान्याचा ८०० क्विंटल तांदुळाचा साठा शासनाधीन !

शासकीय स्वस्त धान्याच्या विक्रीमध्ये अनेक वेळा घोटाळे होतात. धान्याची काळ्या बाजारातील विक्री पूर्णपणे थांबवण्यासाठी आरोपींवर कठोर कारवाई करायला हवी. – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

हडपसर (पुणे) – काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा शासकीय स्वस्त धान्याचा ८०० क्विंटल तांदुळाचा साठा गुन्हे शाखेच्या पथकाने शासनाधीन केला. ‘श्री कनकलक्ष्मी ॲग्रो ट्रेडर्स’, ‘जय आनंद फूड इंडस्ट्रीज’ आणि ‘मुबारक ट्रान्सपोर्ट’ या आस्थापनांचे ट्रक आणि त्याच्या चालकांना पोलिसांनी कह्यात घेतले. ट्रकमधील धान्याची किंमत ९७ लाख रुपये आहे. अन्वेषणामध्ये या तांदूळ वाहतुकीसाठी जी.एस्.टी.च्या बनावट पावत्या केल्याचे आढळून आले. गुन्हे शाखेच्या ‘युनिट दोन’च्या पथकाला शासकीय धान्याची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हडपसर येथे सापळा रचून तांदूळ वाहतूक करणारा ट्रक पकडला. हा तांदूळ शिधा वाटप केंद्राचा असून तो खोपोली येथे खुल्या बाजारात विक्रीसाठी नेत होते.