मुलांना हात धुण्याचे महत्त्व सांगण्याचे अभियान राबवणार्‍या जोधपूरच्या डॉ. शीला आसोपा यांना राष्ट्रीय पुरस्कार !

भारतात अशासाठीही जागृती करावी लागते, हे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत देशावर राज्य करणार्‍या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक

प्राचार्य डॉ. शीला आसोपा

जोधपूर (राजस्थान) – हात धुण्याचे महत्त्व आणि त्याची प्रत्यक्ष कृती करून घेण्याच्या संदर्भात कार्य केल्यावरून केंद्र सरकारने येथील उच्च माध्यमिक शाळेच्या प्राचार्य डॉ. शीला आसोपा यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले. डॉ. शीला यांनी गेल्या ५ वर्षांत ५०० शाळांतील सुमारे २५० अंगणवाडी केंद्राद्वारे ३० सहस्र विद्यार्थ्यांमध्ये हात धुण्याविषयी जागृती केली. लंडनची ‘वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी’, ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ यांनीही त्यांचा गौरव केला होता.

१. शालेय अभ्यासक्रमात हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व, जागृती, हात दूषित असण्याचे दुष्परिणाम, योग्य प्रकारे हात धुण्याची पद्धत इत्यादी गोष्टींचा समावेश केला जावा, अशी सूचना आल्यानंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणातील नियमित प्रशिक्षण कार्यक्रमात या सूत्राचा समावेश केला आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून त्याचा अभ्यासक्रमात समावेश केला जाणार आहे.

२. डॉ. शीला जोधपूर जिल्ह्यातील शाळांत स्वत:चा ‘प्रोजेक्टर’ घेऊन जातात. ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’च्या माध्यमातून त्या मुलांना ‘हात कसे स्वच्छ धुतले पाहिजेत ?’ याची माहिती देतात. त्यात अंगठा, करंगळी वगैरे स्वच्छ धुण्याच्या पद्धतींविषयी तपशीलवार माहिती त्या देतात. त्यासाठी त्यांनी आतापर्यंत २५ सहस्रांहून अधिक हस्तपत्रकांचे वाटप करून जनजागृतीही केली आहे.