कोल्हापूर, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – कोल्हापुरातील ‘जयप्रभा स्टुडिओ’ची विक्री झाल्याचा प्रकार काल उघडकीस आला. खरेदी करणार्यांमध्ये काही राजकीय नेत्यांच्या मुलांची भागीदारी असल्याचे समोर आले आहे. या स्टुडिओत भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याची मागणी होत होती. हा स्टुडिओ वाचावा या मागणीसाठी स्टुडिओच्या दारात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने १३ फेब्रुवारीपासून साखळी उपोषण चालू करण्यात आले आहे.
स्टुडिओची खरेदी करणार्या रोनक शहा आणि पोपट शहा यांच्या भवानी मंडप परिसरात असलेल्या दुकानावर काही लोकांनी शाई फेकली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता; मात्र पोलिसांनी यात हस्तक्षेप करत आंदोलकांना कह्यात घेतले.
निवडणुकीच्या तोंडावर राजकीय अपकिर्तीचे षड्यंत्र ! – राजेश क्षीरसागर, शिवसेनेचे नेते आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष
कोल्हापूर – कोल्हापूर शहराची अस्मिता असणारा आणि चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार अशा या स्टुडिओची भूमी भारतरत्न कै. लता मंगेशकर यांनी खरेदी केली होती. यातील अर्धी भूमी त्यांनी काही वर्षांपूर्वी विकली असून, उर्वरित भूमी ‘श्री महालक्ष्मी स्टुडिओज एल्.एल्.पी.’ या आस्थापनाने कायदेशीररित्या खरेदी केली आहे. सदर खरेदीत माझ्या मुलांनी गुंतवणूक केल्याविषयी मी अनभिज्ञ होतो. या संदर्भात तात्काळ नगरविकासमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्याकडे ही भूमी शासनाने कह्यात घेऊन कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडे संवर्धन आणि स्मारक विकासासाठी द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. या भूमीच्या खरेदी व्यवहाराबाबत निवडणुकीच्या तोंडावर राजकीय अपकिर्तीचे षड्यंत्र आखण्यात आले आहे. जयप्रभा स्टुडिओविषयी जनभावना लक्षात घेऊन या ठिकाणच्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे आणि कै. लता मंगेशकर यांचे स्मारक उभे रहावे, यासाठी पुढील काळात प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेते आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केले.