‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, लांजा आणि रत्नागिरी येथे महाविद्यालये आणि प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन सादर

रत्नागिरी, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – गेल्या काही वर्षांत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करावी. ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा-महाविद्यालये यांच्या परिसरातील कायदा-सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे होणार्‍या घटनांचा अतिरिक्त ताण पोलीस आणि प्रशासन यांवरही येत आहे. अपप्रकारांचे प्रमाण पहाता महाविद्यालयांत ‘व्हॅलेंटाईन डे’चे दुष्परिणाम, तसेच भारतीय संस्कृतीची महती सांगणार्‍या व्याख्यानांचे आयोजन करावे, महाविद्यालयात ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यास अनुमती देऊ नये आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. हे निवेदन रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, लांजा आणि रत्नागिरी महाविद्यालये, तसेच प्रशासकीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.

दापोली

डावीकडून दापोली येथील नायब तहसीलदार रणजीत शिराळकर यांना निवेदन देतांना सर्वश्री दर्शन मोरे, प्रल्हाद मनवळ आणि चिन्मय गुरव

येथील दापोली नायब तहसीलदार रणजीत शिराळकर, दापोली पोलीस ठाणे अंमलदार धोंडू गोरे, रामराजे महाविद्यालय दापोलीचे सहशिक्षक श्री. कुणाल मंडलिक, वराडकर-बेलोसे महाविद्यालय दापोलीचे प्राचार्य एस्.टी. निंबाळकर, ए.जी. हायस्कूल दापोलीचे उपमुख्याध्यापक शरद कांबळे, दापोली अर्बन सीनियर सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांना निवेदने देण्यात आली. या वेळी ‘धर्मवीर प्रतिष्ठान हर्णे’चे धर्मप्रेमी श्री. दर्शन मोरे, श्री चिन्मय गुरव आणि सनातन संस्थेचे श्री. प्रल्हाद मनवळ उपस्थित होते.

लांजा

लांजा येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे प्रबोधन करतांना डॉ. समीर घोरपडे आणि एकाग्रतेने विषय ऐकतांना विद्यार्थी-विद्यार्थिनी

१. येथील तहसीलदार प्रमोद कदम यांना निवेदन देण्यात आले. या वेळी वारकरी संप्रदायाचे, तसेच दैनिक ‘सागर’चे वार्ताहर ह.भ.प. गोविंद चव्हाण, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रेखा बर्वे आणि सनातन संस्थेच्या कु. सोनाली शेट्ये उपस्थित होत्या.

२. येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूल आणि तु.पु. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयात येथे ‘व्हॅलेंटाईन डे’विषयी प्रबोधनात्मक व्याख्यान घेण्यात आले. या व्याख्यानाचा लाभ  एकूण ५३ विद्यार्थ्यांनी घेतला.

प्राचार्य श्री. सावंत यांनी विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे प्रबोधन केल्याचे आणि त्यांना ही माहिती देणे खूप आवश्यक असल्याचे सांगून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक केले. या वेळी श्री. उदय केळुसकर, डॉ. समीर घोरपडे आणि सौ. रेखा बर्वे उपस्थित होत्या.

रत्नागिरी

रत्नागिरी येथे १. प्राचार्या (सौ.) आशा जगदाळे यांना निवेदन देतांना सौ. मंजिरी बेडेकर आणि डावीकडून श्री. चंद्रशेखर गुडेकर, श्री. अशोक पाटील अन् कुमारी नयना दळवी

येथील नवनिर्माण महाविद्यालयात प्राचार्या (सौ.) आशा जगदाळे यांना हे निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. चंद्रशेखर गुडेकर, श्री. अशोक पाटील, कुमारी नयना दळवी आणि सनातन संस्थेच्या सौ. मंजिरी बेडेकर उपस्थित होत्या.

हे निवेदन स्वीकारल्यावर प्राचार्या (सौ.) आशा जगदाळे म्हणाल्या की, ‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या कुप्रथांविषयी समाजात, तसेच विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन होणे आवश्यक आहे. आमच्या महाविद्यालयामध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जात नाही; मात्र तुम्ही दिलेले निवेदन आम्ही लगेच ‘नोटीस बोर्ड’वर लावतो.