अलिकडे तरुणाईला झटपट प्रसिद्ध होण्याची ओढ लागली आहे. त्यासाठी दीर्घकालीन कष्ट करण्याची सिद्धता नाही. ‘फेसबूक’, ‘व्हॉट्सॲप’, ‘इन्स्टाग्राम’, ‘रिल’ यांसह अन्य माध्यमांवर अल्प वेळेत प्रसिद्धी मिळते, हे लक्षात आल्यावर आज तरुण पिढी या माध्यमांच्या आहारी जाऊन त्यासाठी टोकाचे पाऊलही उचलत आहे. अशा प्रकारे पिंपरी-चिंचवडमधील केवळ १८ वर्षीय तरुणीने ‘इन्स्टाग्राम’वर ‘थेरगाव क्विन’ (थेरगावची राणी) नावाचे ‘अकाऊंट’ उघडले. ही तरुणी दोन मित्रांच्या साहाय्याने सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषा वापरणे, शिव्या देणे आणि लोकांना धमक्या देणारे व्हिडिओ सिद्ध करून ते ‘पोस्ट’ (प्रसारीत) करत असे. काही मासातच त्यांचे ४१ सहस्र ‘फॉलोअर्स’ झाल्याने आणखीन हव्यासापोटी अधिक अश्लील भाषा आणि थेट लोकांची नावे घेऊन धमकीचे व्हिडिओ बनवणे चालू केले. काही दिवसांतच ही तरुणी ‘लेडी डॉन’ (कुख्यात महिला) म्हणून ओळखली जाऊ लागली.
ही गोष्ट पोलिसांपर्यंत पोचल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले. पोलिसांनी सगळ्यांच्या मुसक्या आवळून त्यांची रवानगी कोठडीत केली. त्यानंतर पोलिसांनी युवतीला समज देऊन सोडून दिले. युवतीला आईवडील नसून तिचा सांभाळ आजी करते. त्यामुळे घरी विचारणारे कुणीच नसल्याने ‘इन्स्टाग्राम’वर मिळणार्या ‘लाईक्स’च्या हव्यासापोटी तिने असे व्हिडिओ बनवण्यास प्रारंभ केल्याचे सांगितले. शालेय शिक्षणापासून धर्मशिक्षणाचा अभाव असल्याने योग्य काय ? अयोग्य काय ? यांतील भेद कळण्याची विवेक बुद्धी जागृत नसल्याने आजचे तरुण कशा प्रकारे भरकटले आहेत, याचेच हे उत्तम उदाहरण आहे. कोणतेही श्रम न करता मिळणार्या प्रसिद्धीच्या मागे लागून कधी ही युवती आणि तिचे मित्र गुन्हेगारीच्या उंबरठ्यापर्यंत पोचले, हे त्यांनाही कळलेच नाही.
याउलट कोरोना संसर्गाच्या काळात अनेकांनी ‘व्हॉट्सॲप’वर शालेय मित्रांचे गट बनवून गरजू रुग्णांना औषधे मिळवून देणे, फेसबूकद्वारे लोकांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा मिळवून देणे, नियमित योगासने यांचे वर्ग घेणे अशी विधायक कामेही केली. अशी विचार प्रक्रिया जर तरुणांची शालेय जीवनापासूनच झाली तर ‘थेरगाव क्विन’ सारखे प्रकार टळू शकतील ! त्यासाठी शालेय जीवनापासूनच धर्मशिक्षण अपरिहार्य आहे !
– श्री. अजय केळकर, कोल्हापूर.