भाजपचे आमदार नितेश राणे यांना सशर्त जामीन संमत

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील आक्रमणाचे प्रकरण

भाजपचे आमदार नितेश राणे

सिंधुदुर्ग – शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील आक्रमणाच्या प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे, तसेच त्यांचे स्वीय साहाय्यक राकेश परब यांना ९ फेब्रुवारी या दिवशी येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने ३० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन संमत केला आहे. सध्या आमदार राणे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोल्हापूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

१८ डिसेंबरला परब यांच्यावर आक्रमण झाल्यानंतर संशयित आरोपी म्हणून आमदार राणे यांचे नाव आल्यावर त्यांनी प्रथम जिल्हा न्यायालय, नंतर उच्च न्यायालय आणि पुढे सर्वाेच्च न्यायालय येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज प्रविष्ट केला होता; परंतु या तीनही ठिकाणी अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर आमदार राणे यांनी पुन्हा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज प्रविष्ट केला; मात्र न्यायालयाने त्यांना शरण येण्यास सांगितले. त्यानुसार आमदार राणे २ फेब्रुवारीला कणकवली न्यायालयात शरण आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना नियमानुसार अटक करून कणकवली प्रथमवर्ग न्यायालयात उपस्थित केल्यावर न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी बजावली होती. तिचा कालावधी ४ फेब्रुवारीला संपल्यावर न्यायालयाने त्यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी बजावली. यानंतर आमदार राणे यांनी जामीन मिळावा, यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज प्रविष्ट केला होता. त्यावर ८ फेब्रुवारीला सुनावणी होऊन ९ फेब्रुवारीला निकाल घोषित केला. ‘आमदार राणे यांनी आठवड्यातून १ दिवस कणकवली पोलीस ठाण्यात उपस्थित रहावे, तसेच आरोपपत्र प्रविष्ट होईपर्यंत कणकवली येथे येऊ नये’, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.