उत्साही, प्रेमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव असणार्‍या  श्रीमती सुमन झोपे (वय ७३ वर्षे) !

श्रीमती सुमन झोपे

‘श्रीमती सुमन झोपे या अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथे रहातात. त्या वर्षातून काही मास त्यांच्या मुलीकडे वर्धा येथे रहायला येतात. या कालावधीत त्यांची मुलगी सौ. विजया दामोदर भोळे आणि सनातनच्या साधिका श्रीमती मंदाकिनी डगवार यांना श्रीमती झोपे यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सौ. विजया दामोदर भोळे (मुलगी), वर्धा

१. प्रसन्न आणि उत्साही

‘आईच्या नावातच तिचे वैशिष्ट्य सामावले आहे. ती वयाच्या ७३ व्या वर्षीही प्रसन्न, उत्साही आणि नेहमी तत्पर असते.

२. शांत आणि संयमी

आईच्या सासरी ४ दीर, ४ जावा, १ नणंद, सासू आणि सासरे असा परिवार होता. घरात आई मोठी असूनही ती कधीच कुणाशी अधिकारवाणीने बोलली नाही. तिने सर्वांना सांभाळून घेतले. तिचे बोलणे शांत आणि संयमी आहे.

३. साधना

आई अनेक वर्षांपासून नित्यनेमाने विष्णुसहस्रनाम, श्रीरामरक्षा आणि हरिपाठ म्हणते. ती आता सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करते. ती सत्संग आणि भावसत्संग यांत सांगितलेली सूत्रे कृतीत आणते.

४. जवळीक साधणे

आई प्रवास करतांना शेजारी बसलेल्या व्यक्तीची ओळख करून घेते आणि त्यांच्याशी जवळीक साधते. ती स्वतःचा विचार अल्प करते. ती कुणालाही दुखावत नाही.

सौ. विजया भोळे

५. ऐकण्याची वृत्ती असणे

तिला कुणी काही सांगत असेल, तर ती त्यांचे पूर्ण ऐकून घेते आणि स्वतःचे मत शेवटी व्यक्त करते.

६. कठीण प्रसंगांना धिराने सामोरे जाणे

माझ्या वडिलांना काही वर्षे नोकरी नव्हती. त्या वेळी आम्हाला उत्पन्नाचे काहीच साधन नव्हते. आईने ती परिस्थिती प्रारब्ध समजून स्वीकारली आणि त्याला धिराने सामोरे गेली. तिने कपडे शिवून घरखर्च चालवला आणि आमचे शिक्षण पूर्ण केले. तिने काटकसरीने संसार करतांना परिस्थितीला दोष दिला नाही. आता ती आनंदाने जीवन जगत आहे.

७. चुकांची खंत वाटणे

आईकडून लहानशी चूक झाल्यासही ती देवाकडे कान पकडून क्षमायाचना करते. तिच्याकडून एखादी वस्तू फुटली किंवा एखादा पदार्थ सांडून वाया गेला, तर तिला पुष्कळ खंत वाटते.

८. कृतज्ञताभाव 

अ. आईने गुरुदेवांना कधी पाहिले नाही, तरी त्यांची आठवण येऊन तिचा भाव जागृत होतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तिचा गुरुदेवांविषयी भाव जागृत होऊन तिच्या डोळ्यांतून अखंड भावाश्रू येत होते.

आ. तिला सनातनच्या अनेक संतांचा सहवास मिळाला आहे. त्याबद्दल तिला कृतज्ञता वाटते. ‘मी काहीच सेवा करत नसून मला संतांचे दर्शन घडते आणि साधकांचा सहवास मिळतो’, असे तिला वाटते.’

श्रीमती मंदाकिनी डगवार (साधिका, आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), वर्धा

श्रीमती मंदाकिनी डगवार

१. त्या मितभाषी असून नेहमी शांत आणि स्थिर असतात.

२. प्रेमभाव

अ. एकदा मी सेवा करून घरी जायला निघाले होते. तेव्हा झोपेकाकू मला म्हणाल्या, ‘‘थोडे खाऊन घे. नंतर घरी जा.’’ त्यांनी मला खायला दिले.

आ. मी त्यांना सणाच्या दिवशी नमस्कार केल्यावर त्या मला ‘साधनेत लवकर प्रगती होऊ दे’, असा आशीर्वाद देतात.

३. कृतज्ञताभाव

त्यांची मुलगी आणि जावई गुरुसेवा करतात, याबद्दल त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटते.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक १२.१०.२०२१)