‘जीवितनदी’, ‘ऑइकॉस’ या संस्थांचा दावा !
पुणे – नदीपात्रात काँक्रिटीकरण करून, भराव टाकून आणि कोट्यवधी रुपये खर्च करून मुळा-मुठा नदीचे संवर्धन होण्याऐवजी पुणे शहराला त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्याऐवजी कमी व्ययात नैसर्गिक पद्धतीने नदीचे संवर्धन करणे शक्य आहे, अशी भूमिका नदी संवर्धनासाठी काम करणार्या ‘जीवितनदी’, ‘ऑइकॉस’ आणि ‘स्टुडिओ रुट्स’ या संस्थांनी मांडली. ‘सजग नागरिक मंचा’च्या वतीने पुणे महापालिकेच्या ‘नदीकाठ विकसन प्रकल्पा’ला पर्यावरणस्नेही अत्यल्प खर्चिक पर्याय’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले होते. त्या वेळी या तीन संस्थांनी नदी सुधारणा प्रकल्पास पर्याय देणारे सादरीकरण केले. नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा करणार्या भिंती आणि राडारोडा काढून टाकणे, पाणथळ ठिकाण सुरक्षित ठेवणे, कचरा अन् सांडपाणी नदीत येण्यापासून रोखणे या गोष्टी शक्य झाल्यास नदीपात्र नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ होईल आणि नदीतील सजिवांचा अधिवास वाढेल. सध्या वातावरणातील पालटांमुळे अल्प वेळेत अधिक पाऊस पडत असतांना नदी पात्रामध्ये काही पालट करणे धोकादायक आहे. त्यासाठी नदीचे नैसर्गिक पद्धतीने पुनरुज्जीवन आवश्यक आहे, असे मत या तीनही संस्थांनी मांडले.