वेरूळ (संभाजीनगर) येथील ३४ लेण्यांचे वैभव पहाता येण्यासाठी पुरातत्व खाते २० इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणार !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

संभाजीनगर – जिल्ह्यातील वेरूळ लेणीचे २.२ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी होणारी पायपीट आता सुलभ आणि पर्यावरणपूरक होणार आहे. भारतीय पुरातत्व खात्याने लेणी परिसरात फिरण्यासाठी बॅटरीवर चालणारी २० इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचे ठरवले आहे. पहिल्या टप्प्यात वातानुकूलित आणि साधी २० वाहने घेतली जातील. या वाहनांतून प्रवास करतांना ३० ते ४० रुपयांचे तिकीट लागेल. हे वाहन खरेदीसाठी प्रस्ताव मागवण्यात आलेले आहेत, अशी माहिती पुरातत्व विभागाचे अधीक्षक डॉ. मिलनकुमार चावले यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, वेरूळ येथील ३४ लेण्यांचे भलेमोठे अंतर पार करतांना पर्यटकांची दमछाक होते. उन्हाळ्यात हा त्रास अधिकच जाणवतो. या ठिकाणी एस्.टी. महामंडळाची बस धावते; परंतु अजिंठा लेण्याप्रमाणे ती प्रदूषणमुक्त नसल्याने लेण्यांना धोका निर्माण होतो. यावर पर्याय म्हणून पुरातत्व खाते येथे बॅटरीवर चालणारी पर्यावरणपूरक वाहने खरेदी करणार आहे.