७ फेब्रुवारी २०२२ या दिवशी ‘जागतिक सूर्यनमस्कार दिन’ आहे. त्यानिमित्ताने…
१. ॐ मित्राय नमः : ‘सूर्यावर आमचे, निसर्गाचे, पृथ्वीचे जीवन अवलंबून आहे. काळाची परिवर्तने तो घडवून जीवन देतो म्हणून मित्र.
२. ॐ रवये नमः : रवि म्हणजे श्रेष्ठ. सर्व तेजांत सूर्य सर्वाधिक तेज देतो आणि तेजस्वी बनवतो म्हणून रवि.
३. ॐ सूर्याय नमः : सूर्य म्हणजे प्रगती, पराक्रम.
४. ॐ भानवे नमः : वैभव देतो आणि वैभव राखतो तो भानू.
५. ॐ खगाय नमः : सूर्यमालेतील सगळ्या ग्रहांना तोलून धरतो, सावरतो, गती देऊन अंतरिक्षात फिरतो; म्हणून तो खग. या गतीमुळेच दिवस, रात्र, ऋतू, अयन, संवत्सर असे कालचक्र निर्माण होते; म्हणूनच तो खग.
६. ॐ पुष्णे नमः : पुष्टी देतो तो पूषन्. अन्न-वस्त्र समृद्धी देतो तो पुषन्.
७. ॐ हिरण्यगर्भाय नमः : विश्वगोलाला कवटाळून असलेल्या ब्रह्मांडाची जाण देतो तो हिरण्यगर्भ. ब्रह्मांडाचा अल्पसा अंश अशा या आमच्या पृथ्वीवरचा परमात्मा तो हिरण्यगर्भ. हिरण्य म्हणजे ब्रह्मांडाचे सारसर्वस्व. तो सूर्यदेव हा हिरण्यगर्भ.
८. ॐ मरीचये नमः : किरणे विस्तारीतो तो मरीची. सूर्यकिरणे नाना वर्णांची, नाना गुणधर्मांची असतात. काही किरणे अन्नधान्य पिकवतात, काही जीवनसत्त्वे आणि जीवन देतात, काही रोगजंतू नष्ट करतात, तर काही जीवनाला ऊर्जा पुरवतात; म्हणून तो मरीची.
९. ॐ आदित्याय नमः : पृथ्वीवरच्या सर्व ऊर्जा आणि घडामोडी यांचे मूळ सूर्य आहे. ते मूळ, ते मूलत्व प्रकाशित करतो, तो आदित्य.
१०. ॐ सवित्रे नमः : चेतना जागवतो, प्रेरणा देतो आणि परमात्मज्ञान देतो, तो सवितृ. वेदातील सर्वश्रेष्ठ, गायत्रीमंत्राची देवता, तो सवितृ.
११. ॐ अर्काय नमः : वेदमंत्रांना ‘अर्क’ म्हणतात. वेदांना ॐ ची (ॐ मधूनच वाणी प्रकटली) प्रेरणा देतो, तो अर्क.
१२. ॐ भास्कराय नमः : प्रकाश, प्रज्ञा, प्रतिभा देतो, तो भास्कर.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साभार : आदित्य कथा संवाद)