शिक्षण विभागाची मुख्याध्यापकांना नोटीस
सोलापूर – ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले हे सलग ३ वर्षे सेवेत गैरहजर असतांना त्यांना वेतन देण्यात आल्याचे आढळून आले आहे. याविषयी डिसले हे शिक्षक असलेल्या माढा तालुक्यातील परितेवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक समाधान कदम यांना शिक्षण विभागाने नोटीस बजावली आहे. डिसले यांनी ३ वर्षे सेवेत गैरहजर असतांनाही त्या कालावधीत घेतलेले वेतन त्यांच्याकडून वसूल करावे, अशी मागणी सोलापूर प्रदेश शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली आहे.
परितेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहशिक्षक असतांना डिसले गुरुजींना तंत्रस्नेही विशेष शिक्षक म्हणून जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत (डाएट) प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले होते; मात्र तेथे ते सलग ३ वर्षे गैरहजर राहिले. तसा अहवाल जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेकडून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला होता. त्या वेळी गैरहजर असूनही डिसले गुरुजींना वेतन देण्यात आल्याचे समोर आले होते. त्यामुळे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी परितेवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कदम यांना नोटीस बजावून ‘डिसले यांना वेतन का दिले ?’, अशी विचारणा केली आहे.