अमरावती येथील रुग्णालयातील घृणास्पद प्रकार !
अमरावती – कोरोनाच्या चाचणीसाठी गेलेल्या एका तरुणीचा ‘स्वॅब’ घेतेवेळी तिच्याशी अश्लील कृत्य करणारा प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोपी अल्केश देशमुख याला येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश (क्रमांक २) व्ही.एस्. गायकी यांनी २ फेब्रुवारी या दिवशी १० वर्षे सश्रम कारावास, १५ सहस्र रुपये दंड अन् दंड न भरल्यास २ मास अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना २८ जुलै २०२० या दिवशी दुपारी बडनेरा येथील ‘मोदी ट्रॉमा केअर रुग्णालया’त घडली होती. या खटल्यात एकूण १२ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली.
या प्रकरणातील पीडिता कार्यरत असलेल्या डिपार्टमेंटल स्टोअरमधील १ कर्मचारी २४ जुलै २०२० या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यामुळे स्टोअरमधील २० सहकर्मचार्यांना २८ जुलै २०२० या दिवशी बडनेरा येथील मोदी ट्रामा केअर रुग्णालय येथे कोरोनाच्या चाचणीसाठी आवश्यक असलेले ‘स्वॅब’ देण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्या वेळी ही घटना घडली होती.