होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी यांना दैवी कणांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

१. निवासाच्या ठिकाणी वाईट शक्तींचे त्रास होणे आणि त्या कालावधीत सातत्याने दैवी कणांची अनुभूती येणे

‘वर्ष २०१७ पासून मी ज्या ठिकाणी निवासाला होते, त्या ठिकाणी ‘वाईट शक्ती सूक्ष्मातून दिसणे, झोप न येणे, झोप लागलीच तर मधूनच जाग येणे, वाईट शक्तींचा स्पर्श जाणवणे, आवाज येणे’, असे त्रास होत होते. वर्ष २०१९ मध्ये माझी निवासाची खोली पालटल्यावर तेथेही वरील प्रकारेच त्रास होत होते. या दरम्यान विविध आध्यात्मिक स्तरांवरील उपायही चालू होते. तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने दैवी कणांची अनुभूती येत आहे.

होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी

२. रात्री दैवी कणांचा वर्षाव होणे आणि ‘ज्याप्रमाणे वाईट शक्ती ज्या वेगाने त्रास देतात, त्याच वेगाने भगवंत दैवी कणांचा वर्षाव करून साधकांचे रक्षण करतो’, याची तीव्रतेने जाणीव होऊन कृतज्ञता व्यक्त होणे

या कालावधीत रात्री दैवी कणांचा वर्षाव होत होता. खोली झाडल्यावर सुपलीत कचरा उचलतांना हे लक्षात आले. आरंभी आम्हाला वाटले, ‘कपड्यांची चमकी किंवा अन्य काही कारणाने असेल; परंतु नंतर असे काही कारण नसतांनाही दैवी कण आम्हाला दिसत होते. त्याविषयी  सूक्ष्मातील कळणार्‍या साधकांना ‘ते दैवी कण आहेत’, याविषयी पुष्टी मिळाली. निवास पालटल्यावरही ही अनुभूती सातत्याने येत आहे. हे दैवी कण मोरपंखी, पिवळा, चंदेरी, लाल, निळा इत्यादी विविध रंगांचे असतात. या अनुभूतीमुळे ‘ज्याप्रमाणे वाईट शक्ती ज्या वेगाने त्रास देतात, त्याच वेगाने भगवंत दैवी कणांचा वर्षाव करून आमचे रक्षण करतो’, याची तीव्रतेने जाणीव होऊन माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.’

-होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२. ०१. २०२०)

दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे ‘भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे ‘फॉर्म्युले’ सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषि मुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.