तबलावादक आणि ‘संगीत अलंकार (तबला)’ या पदवीने विभूषित असणारे श्री. योगेश सोवनी यांची स्थूल अन् सूक्ष्म स्तरांवर जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

डोंबिवली, जिल्हा ठाणे येथील तबलावादक आणि ‘संगीत अलंकार (तबला)’ या पदवीने विभूषित असणारे श्री. योगेश सोवनी यांची स्थूल अन् सूक्ष्म स्तरांवर जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘२९ आणि ३० डिसेंबर २०२१ या दिवशी डोंबिवली, जिल्हा ठाणे येथील तबलावादक श्री. योगेश सोवनी यांनी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात तबलावादन केले. त्यांचे तबलावादन ऐकत असतांना आणि त्यांचा सहवास अनुभवत असतांना मला त्यांची स्थूल अन् सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवर लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

१. श्री. योगेश सोवनी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. योगेश सोवनी

१ अ. अहं अल्प असल्यामुळे आध्यात्मिक उन्नती होत असणे : श्री. योगेश सोवनी सतत शिष्यभावात असल्यामुळे ते सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. त्यांचा अहं अल्प असल्यामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती होत आहे.

१ आ. विनम्रता आणि शिकण्याची वृत्ती सतत जागृत असणे : श्री. सोवनी यांची गेल्या जन्मीची साधना असल्यामुळे त्यांच्यामध्ये मुळातच विनम्रता आणि शिकण्याची वृत्ती सतत जागृत असते. त्यामुळे ते तबलावादन आणि संगीत या क्षेत्रांतील अनेक प्रकारचे बारकावे शिकत आहेत. त्यामुळे त्यांची तबलावादनाची कला आणि संगीताचे ज्ञान यांमध्ये दिवसेंदिवस वृद्धी होत आहे.

१ इ. श्री. सोवनी तबलावादन करत असतांना ते तबल्याच्या बोलांशी पूर्णपणे एकरूप झाल्याचे जाणवणे : श्री. सोवनी तबलावादन इतक्या तन्मयतेने करतात की, ते तबल्याच्या बोलांशी पूर्णपणे एकरूप होतात. त्यामुळे तबलावादन करत असतांना त्यांना वेळेचे भान रहात नाही. ‘देहभान हरपून नादाची उपासना कशी करायची असते?’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले.

१ ई. श्री. सोवनी यांच्यावर झालेल्या श्री गणेशाच्या कृपेमुळे त्यांना ‘तबला’ या वाद्याचे ज्ञान प्राप्त झालेले असणे : त्यांनी गेल्या जन्मी श्री गणेशाची उपासना केल्यामुळे त्यांच्यावर बुद्धीदाता श्री गणेशाची कृपा असल्यामुळे त्यांची बुद्धी सात्त्विक आहे. त्यामुळे त्यांना तबलावादनाची कला आणि संगीताचे ज्ञान पुष्कळ प्रमाणात आकलन होते. श्रीकृष्णाप्रमाणे श्री गणेशालाही ६ शास्त्रे, १४ विद्या आणि ६४ कला यांचे ज्ञान आहे. त्यामुळे श्री. सोवनी यांच्यावर झालेल्या श्री गणेशाच्या कृपेमुळे त्यांना ‘तबलावादन’ म्हणजे संगीतकलेतील एका वाद्याचे ज्ञान प्राप्त झाले असून ते या कलेत निपुण झाले आहेत. श्री. सोवनी यांच्या देहाभोवती सूक्ष्मातून १ इंच रुंदीचे आणि लालसर रंगाचे संरक्षककवच कार्यरत असल्याचे जाणवले. या कवचातील देवीतत्त्वामुळे शक्ती आणि गणेशतत्त्वामुळे मला आनंदाची अनुभूती आली. मला त्यांच्यावर श्री गणेश आणि श्री योगेश्वरीदेवी यांची कृपा असल्याचे जाणवले. त्याचप्रमाणे त्यांच्यावर शिव आणि पार्वती यांचीही कृपा असल्याचे जाणवले. (श्री. सोवनी यांना त्यांच्या लहानपणापासून श्री गणेश आवडत असल्याने ते त्याची उपासना करत आहेत आणि ते त्यांची कुलदेवी ‘श्री योगेश्वरीदेवीची’ उपासना करतात’, असे त्यांनी आम्हाला नंतर सांगितले. – कु. मधुरा भोसले)

२. श्री. सोवनी तबलावादन करत असतांना सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे

कु. मधुरा भोसले

२ अ. श्री. सोवनी यांच्या डोक्यावर प्रकाशाच्या दोन गोळ्यांच्या रूपांत त्यांचे दोन गुरु सूक्ष्मातून कार्यक्रमस्थळी आल्याचे जाणवणे : श्री. सोवनी जेव्हा तबलावादन करत होते, तेव्हा त्यांना तबला शिकवणारे त्यांचे दोन गुरु सूक्ष्मातून त्यांच्या जवळ आल्याचे जाणवले. तेव्हा मला त्यांच्या डोक्यावर प्रकाशाच्या दोन गोळ्यांचे दर्शन झाले. (‘श्री. सोवनी यांना अल्लारखा यांनी तबल्याचे ज्ञान दिले आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीताचे ज्ञान दिले होते’, हे सूत्र श्री. सोवनी यांनी आम्हाला नंतर सांगितले. – कु. मधुरा भोसले)

२ आ. श्री. सोवनी यांचे तबलावादन सात्त्विक असल्यामुळे त्यांच्या तबलावादनाच्या वेळी उच्च स्वर्गलोकातून दैवी शक्तीचा प्रवाह पृथ्वीवर येणे : श्री. सोवनी हे सात्त्विक तबलावादन करतात. त्यामुळे ते तबलावादन करत असतांना उच्च स्वर्गलोकातून दैवी शक्तीचा प्रवाह पृथ्वीवर येऊन कार्यक्रमस्थळी कार्यरत झाला आणि कार्यक्रमस्थळी उच्च स्वर्गलोकाचे १० टक्के वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांचे तबलावादन चालू असतांना सूक्ष्मातून मंद दैवी सुगंध येत होता.

२ इ. श्री. सोवनी यांचे तबलावादन चालू असतांना उच्च स्वर्गलोकातून आलेला शक्तीचा प्रवाह त्यांच्या सहस्रारचक्रातून त्यांच्या देहात प्रविष्ट होणे : जेव्हा श्री. सोवनी तबलावादन करत होते, तेव्हा त्यांच्याकडे उच्च स्वर्गलोकातील शक्तीचा प्रवाह आला आणि तो त्यांच्या सहस्रारचक्रातून त्यांच्या देहात प्रविष्ट झाला. त्यामुळे जेव्हा त्यांनी तबलावादन केले, तेव्हा हा दैवी शक्तीचा प्रवाह त्यांच्या संपूर्ण देहात पसरला आणि त्यांचे डोळे अन् हात यांतून वातावरणात प्रक्षेपित झाला.

२ ई. श्री. सोवनी तबलावादन करत असतांना उच्च स्वर्गलोकातून ५ टक्के तेजतत्त्व आणि १५ टक्के नादतत्त्व यांच्या लहरी पृथ्वीच्या दिशेने आकृष्ट होणे : श्री. सोवनी तबलावादन करत असतांना उच्च स्वर्गलोकातून ५ टक्के तेजतत्त्व आणि १५ टक्के नादतत्त्व यांच्या लहरी पृथ्वीच्या दिशेने आकृष्ट झाल्या. या लहरी कार्यक्रमस्थळी कार्यरत झाल्यामुळे तेथील वातावरण तेजतत्त्वमय लहरींमुळे तेजोमय आणि उजळ अन् नादलहरींमुळे नादमय, तसेच आनंदी झाले. अशा प्रकारे प्रयोगाला उपस्थित असणार्‍या साधकांवर तेजोलहरींमुळे सूक्ष्मदेह आणि नादलहरींमुळे सूक्ष्मकोश यांच्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन त्यांची सात्त्विकता वाढली.

२ ई १. सूक्ष्म देह आणि सूक्ष्म कोश यांच्याशी संबंधित पंचतत्त्वे ! : ‘देहांपेक्षा कोश अधिक सूक्ष्म असतात. त्यामुळे पंचतत्त्वांपैकी पृथ्वी, आप आणि तेज या तत्त्वांमध्ये सगुण-निर्गुण स्तरावरील शक्ती अन् चैतन्य कार्यरत असल्यामुळे त्यांच्या लहरी स्थूल आणि सूक्ष्म देहांशी संबंधित असतात. वायू आणि आकाश या तत्त्वांमध्ये निर्गुण-सगुण स्तरावरील शक्ती अन् चैतन्य कार्यरत असल्यामुळे त्यांच्या लहरी सूक्ष्म कोशांशी संबंधित असतात.’

२ उ. स्वत:कडून होणार्‍या चुकांप्रती संवेदनशीलता आणि अपराधीभाव असणे : श्री. सोवनी तबलावादन करत असतांना त्यांच्याकडून एक चूक झाली. तेव्हा त्यांनी त्यांच्या उजव्या हाताने त्यांच्या उजव्या कानाला स्पर्श केला आणि त्यांच्या गुरूंची मनोमन क्षमा मागितली. यावरून त्यांच्यातील ‘अंतर्मुखता, स्वत:कडून होणार्‍या चुकांप्रती संवेदनशीलता आणि चुकांमुळे मनात निर्माण झालेला अपराधीभाव’, या गुणांचे दर्शन झाले.

३. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘गुरुदेवा, तुमच्या कृपेने श्री. योगेश सोवनी यांची गुणवैशिष्ट्ये लक्षात आली आणि त्यांतून शिकता आले, यासाठी मी श्रीगुरुचरणी कृतज्ञ आहे. ही गुणवैशिष्ट्ये मला आत्मसात करता येऊ देत आणि माझी साधना चांगली होऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१.२०२२)

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.