भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना क्रीडाविश्‍वातील ‘ऑस्कर’साठी नामांकन !

टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकलेले भालाफेकपटू नीरज चोप्रा

नवी देहली – क्रीडाविश्‍वातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणारा ‘लॉरियस पुरस्कारा’च्या संदर्भात महत्त्वाची घोषणा झाली आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकलेले भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना ‘लॉरियस वर्ल्ड ब्रेकथ्रू ऑफ दी इयर’ या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. या पुरस्काराला क्रीडाविश्‍वातील ‘ऑस्कर’ समजले जाते. हे नामांकन मिळवणारे नीरज चोप्रा हे तिसरे भारतीय ठरले आहेत. यापूर्वी वर्ष २०१९ मध्ये कुस्तीपटू विनेश फोगाट आणि वर्ष २०२० मध्ये सचिन तेंडुलकर यांना हे नामांकन मिळाले होते. सचिन तेंडुलकर हे लॉरियस क्रीडा पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू ठरले होते. चोप्रा यांच्याखेरीज अन्य खेळांमधील ५ खेळांडूनाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.