संकेश्वर मठ (कर्नाटक) येथील मठ रथोत्सव आणि यात्रा ६ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत होणार !

संकेश्वर (कर्नाटक), ३० जानेवारी (वार्ता.) – येथील ग्रामदैवत श्रीमद् जगद्गुरु श्री शंकराचार्य मठ सिद्ध सांख्येश्वर यात्रा आणि रथोत्सव ६ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. यानिमित्ताने वेदपारायण, महारुद्राभिषेक, रुद्रपंचायतन, श्रीसुक्त होम यांचे आयोजन केले आहे. भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापकांनी केले आहे.

६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी १० वाजता उदकशांती होमाने उत्सवाचा प्रारंभ होईल. यानंतर प्रतिदिन विविध धार्मिक कार्यक्रम होतील. ११ फेब्रुवारी या दिवशी महायात्रा होईल. १२ ते १६ फेब्रुवारीअखेर महारुद्र अभिषेक, रुद्रपंचायतन, श्रीसुक्तहोम होणार आहे. श्री शंकराचार्य मठाच्या वतीने चांदीची पालखी घडवण्यात आली आहे. या पालखीचे उद्घाटन ७ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ३ वाजता श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य संस्थान मठाचे पिठाधीश्वर सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंह भारती स्वामीजी (कोल्हापूर) आणि पंचम जगद्गुरु शिवलिंगेश्वर स्वामीजी सिद्धसंस्थान मठ-निडसोशी यांच्या हस्ते होणार आहे.