हिंदूंच्या देवतांचा अवमान करणे, हा गुन्हाच ! – मद्रास उच्च न्यायालय

  • असे असूनही म.फि. हुसेन याने हिंदु देवतांची नग्न चित्रे काढली. अनेक चित्रपट, नाटके, वेब सीरिज, विज्ञापने यांमधून देवता आणि हिंदूंची श्रद्धास्थाने, प्रथा-परंपरा आदींवर यथेच्छ चिखलफेक वारंवार केली गेली. तरीही विडंबन करणार्‍यांच्या विरोधात कोणतीच कारवाई होतांना कधीच दिसत नाही, हे लज्जास्पद ! यासाठी न्यायालयाने अशा निकालांसह अशा घटना घडू नयेत, म्हणून कठोर भूमिका घ्यावी. सरकार अन् प्रशासन यांना या विरोधात कारवाई करण्याचे दिशानिर्देश द्यावेत आणि यासंदर्भात कायमस्वरूपी अन् प्रभावी उपाययोजना काढावी, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक
  • हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान रोखण्यासाठी ईशनिंदा विरोधी कायदा होणे आवश्यक ! – संपादक
पाद्री जॉर्ज पोन्नैया

चेन्नई (तमिळनाडू) – हिंदूंच्या देवतांची खिल्ली उडवणे, संतापजनक टिपण्या देणे, हा भारतीय दंड संहितेनुसार फौजदारी गुन्हा आहे, असे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये कन्याकुमारी पोलिसांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी पाद्री जॉर्ज पोन्नैया यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता. त्याला पोन्नैया यांनी मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर न्यायालयाने वरील मत व्यक्त करत ही याचिका फेटाळून लावली.

न्यायालयाने म्हटले, ‘पोन्नैया यांनी भारतमाता आणि भूमीदेवी यांच्या विरोधात निंदनीय टिपणी केली आहे. हे हिंदूंच्या भावना दुखावण्यासारखे आहे; कारण हिंदु संकल्पनेनुसार दोघेही देव आहेत. त्यामुळे ही टिपणी भारतीय दंड विधानाच्या अंतर्गत गुन्हा ठरते. गुन्हा नोंदवणार्‍या पोलिसांना दोष देता येणार नाही.’