कायद्याचा धाक नसलेली जनता निर्माण होणे हे राष्ट्रासाठी घातक ! – संपादक
जालना – गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील व्यावसायिक कैलास शिंगटे यांचे २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी ५ ते ६ जणांनी साठेवाडी फाटा येथून अपहरण केले. त्यानंतर तोंडात बोळा कोंबून आणि हातपाय बांधून त्यांना मारहाण करत वडीगोद्रीजवळ पाटात फेकून दिले.
अपहरणकर्त्यांचे १ चारचाकी वाहन बंद पडल्याने त्यांनी ते वाहन अंतरवाली शिवारात ढकलून दिले. दुसर्या चारचाकी वाहनातून पोबारा केला. ही घटना २६ जानेवारीच्या रात्री घडली आहे.
या प्रकरणी शिंगटे यांचा गोंदी पोलिसांनी जवाब नोंदवला असून अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा गुन्हा चकलांबा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. शिंगटे यांचे अपहरण केल्यानंतर त्यांच्याकडे खंडणीखोरांनी २ कोटी रुपयांची मागणी केल्याचे त्यांनी म्हटले आहे; मात्र ‘खंडेणीखोरांना खंडणीच घ्यायची होती, तर शिंगटे यांना त्यांनी रस्त्यात फेकून का दिले ?’, असा प्रश्न उपस्थित होत आहे.